भूजल पुनर्भरण विषयावर तांत्रिक मार्गदर्शन

भूजल पुनर्भरण विषयावर तांत्रिक मार्गदर्शन

चंद्रपूर दि. 6 जुलै : राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्ह्याची टंचाई परिस्थिती निवारण, जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करुन देणे, हवामान बदल आणि जल व्यवस्थापन, भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना इ.ची माहिती व जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हयात भूजल या विषयावर जनजागृती मोहीम राबविली जात आहे.

या अनुषंगाने वेबिनार श्रुखंला दि. 10 जुलै 2021 या कालावधीत सुरु राहणार आहे. तसेच सर्व सरपंच, ग्रामसेवक व जलसुरक्षक यांच्यासाठी दररोज सकाळी 11 ते 12 व दुपारी 3 ते 4 या वेळेत ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे..

आजपर्यंत जिल्ह्यातील सर्व भूगर्भशास्त्र, भूगोल व कृषी विषयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, एनएसएस तसेच नेहरू युवा केंद्राच्या मान्यवरांना वेबिनारद्वारे जिल्ह्याची भूशास्त्रीय व भूजल वैशिष्ट्ये, भूजलाची गुणवत्ता, भुजलावरील ताण व आव्हाने, पाऊस पाणी व भूजल पातळी मोजमाप, पाण्याचा ताळेबंद इ. विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर वेबिनारमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे, संचालक मल्लिनाथ कळशेट्टी यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

सदर वेबिनारची लिंक कार्यालयीन वेळेत दिलेल्या विहित कालावधीत संबंधितांना पुरविण्यात येईल. तरी आपल्या स्वतःच्या मोबाईलवर गुगल मीट हे ॲप डाऊनलोड करावे. पुरविण्यात येणाऱ्या लिंकला जॉईन करून सदर वेबिनारमध्ये उपस्थिती दर्शवावी व भूजल पुनर्भरण या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या, वरिष्ठ भूवैज्ञानिक, डॉ. विजयता सोलंकी यांनी केले आहे.