ई-पीक पाहणी मोबाईल अॅपचा वापर करावा

ई-पीक पाहणी मोबाईल अॅपचा वापर करावा

भंडारा दि. 3 : महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्वकांशी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. गत वर्षी पासून ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अँप द्वारे आता पर्यंत सुमरे 11 कोटी 11 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अॅपमध्ये नोंदणी केली आहे. मागील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अंतगर्त शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करुन या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.

गतवर्षी खरीप हंगाम मध्ये 99,57,944 हेक्टर, रब्बी हंगामामध्ये 22,52,056 हेक्टर, उन्हाळी हंगामामध्ये 2,91,133 हेक्टर क्षेत्रावर तर बहुवार्षीक पिकांतर्गत 44,12,386 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी अॅपद्वारे 400 च्या वर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.

खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे नोंदविण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाईल अॅप व्हर्जन 2 विकसित करण्यात आलेले आहे. व सदरचे सुधारित मोबाईल अॅप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देत आहे.

ई-पीक पाहणी व्हर्जन -2 अॅप मधिल नवीन सुधारणा

Geo Fencing सुविधा.

सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्य मध्यबिंदूचे (centroid) अक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना पिकाचा फोटो घेतील त्यावेडेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू (centroid) पर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. व शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्या बाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकांचा अचुक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणीत मानण्यत येणार.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणर असून अश्या रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमणित मानण्यात येऊन ती गाव नमुन नंबर 12 मध्ये प्रतिबिंबीत होणार आहे.

किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत होणार.

वरील प्रमाणे शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी 10% नोंदीची पडताळणी तलाठी यांचे मार्फत करण्यात येणार असुन त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकिचा फोटो असलेल्य नोंदी व विहित अंतराच्या बाहेरुन घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे. तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करुन त्या नोंदी सत्यापित करतील. व त्यानंतर त्या गाव नमुन नंबर 12 मध्ये प्रतिबिबीत होतील.

48 तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्ती सुविधा

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी अशी पीक पाहणी नोंदविल्या पासून 48 तासामध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.

किमान आधारभूत किंमत योजनेंअतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा

किमान आधारभूत योजने अंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास ई-पीक पाहणी अॅपमध्येच शेतकऱ्याला “आपणास किमान आधारभूत किमान योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय?” असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्याने होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही..

मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा.

यापूवीच्या मोबाईल अॅपमध्ये मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणी प्रमाणे एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा.

ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पिक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांचे कडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

अॅप बाबत अभिप्राय व रेटिंग नोंदविण्याची सुविधा

ई-पीक पाहणी व्हर्जन -2 मध्ये वापरकर्त्यांना ॲप बाबत त्याचे अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ई-पीक पाहणी अॅपमध्येच मदत बटन देण्यात आलेले आहे.

वापरकत्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप वापरतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये “मदत” हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. तसेच ई-पीक पाहणी अॅपमधिल कायम पड क्षेत्र नोंदविणे बांधावरची झाडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे, गावची पिक पाहणी पाहणे,इत्यादी बाबतची माहिती देणाऱ्या दृकश्राव्य क्लीप (audio video clip) च्या लिंक देण्यात आलेल्या आहेत याचा वापर करून शेतकरी अॅप वापरतांना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई- पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. कारण ई-पिक पाहणीच्या नोंदी या पीक विमा, व विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे इत्यादी बाबीसाठी आवश्यक असणार आहेत.

खरीप हंगाम 2022 चे पीक पाहणीची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु करण्यात आलेली आहे. या साठी वर नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप व्हर्जन -2 गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे सुधारित मोबाईल अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून खरीप हांगामातील पीक पाहणी  विहित वेळेत पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे.