सरपंच संघटनेचा एकच निर्धार …….. ! आता घरोघरी तिरंगा फडकणार ……. !!

सरपंच संघटनेचा एकच निर्धार …….. ! आता घरोघरी तिरंगा फडकणार ……. !!

पंचायत समिती लाखनी येथील सभेत सरपंचांनी केला निश्चय

भंडारा दि. 3 : स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत नियोजन करीता लाखनी तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंचांची बैठक सभापती प्रणाली सार्वे यांच्या अध्य्षतेखाली तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. बोळणे यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आली. त्यामधे प्रत्येक ग्रामपंचायत निहाय झेंड्यांची उपलब्धता, विक्री, पुरवठा व दक्षता, तसेच ग्रामसभा, विविध स्पर्धा घेणेबाबत व प्रचार-प्रसिद्धी करणेबाबत, गट विकास अधिकारी, डॉ शेखर जाधव यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार महेश शितोळे यांनी ध्वजसंहिता व लोकप्रतिनिधींचा व प्रशासनाचा सहभाग व इतर बाबतीत उहापोह केला. काही सरपंच प्रतिनिधी यांनी आपले नियोजन यावेळी सादर केले.

ग्रामस्तरीय समितीद्वारे होणार अमलबजावणी

लाखनी तालुक्यात प्रत्येक गावात, ग्रामस्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली गावातील सर्व लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांत काम करत आहेत. ध्वजाची उपलब्धता, विक्री, प्रचार-प्रसिद्धी याबाबत उमेद बचतगटातील महिला उत्साहाने सहभागी होत आहेत. प्रत्येक गावात तिरंगा प्रतिनिधींची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे.

विविध स्पर्धांचे नियोजन

शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व व इतर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच अंगणवाडी मध्ये सुदृढ बालक स्पर्धा, गोपाळांचीची पंगत व पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

आरोग्याचा होणार जागर

स्वराज्य महोत्सवामध्ये प्रत्येक गावात आरोग्य शिबीर, किशोरी मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे, तर तालुकास्तरावर रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

सर्व सरपंच महोदयांनी यावेळी उपक्रम यशस्वी करणेबाबत सहमती दर्शवली. तसेच, गावस्तरावर याबाबत येऊ शकणाऱ्या अडचणीबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. सरपंच श्रीमती कांबळे मॅडम, श्री. खेडीकर व श्री. बोळणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तर उमेदच्या सविता खेडीकर यांनी आभार प्रदर्शन केले.