कृषी पायाभुत सुविधा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा Ø अतिरिक्त जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

कृषी पायाभुत सुविधा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा Ø अतिरिक्त जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

चंद्रपूर, दि. 22 जुलै : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आदींसाठी कृषी पायाभुत सुविधा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा नियोजन सभागृहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक तृणाल फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, कृषी उपसंचालक श्री. मनोहरे उपस्थित होते.

यावेळी श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, कृषी विभागाने एका चांगल्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या भागातील बहुतांश शेतकरी एकाच पिकावर अवलंबून असल्याचे निदर्शनास येते. निसर्गाच्या लहरीपणामुळे जर ते पीक व्यवस्थित हाती आले नाही, तर त्याचा फटका शेतक-यांना बसतो. त्यामुळे दुबार पीक उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाने शेतक-यांना प्रवृत्त करावे. कोरोनाच्या महामारीनंतर नागरिक आपल्या आरोग्याबाबत अतिशय जागरूक झाले आहेत. जास्तीत जास्त प्रोटीन युक्त खाण्याकडे नागरिकांचा कल असल्यामुळे शेतक-यांनी सेंद्रीय शेती केली तर त्याचा फायदा विक्रीतून शेतक-यांना होईल. शिवाय नागरिकांना रसायनमुक्त खायला मिळेल. धानाच्या अनेक स्थानिक जाती या जिल्ह्यात विकसीत करण्यात आल्या आहेत. त्यावर येथेच प्रक्रिया झाली तर मोठ्या प्रमाणात चंद्रपूरच्या तांदळाची निर्यात करणे होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकातून कृषी अधिकारी श्री. ब-हाटे यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात पायाभुत सुविधेशिवाय प्रगती होणार नाही. गोदाम बांधकाम, प्रक्रिया उद्योग, पॅकहाऊस आदी बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. कृषी पायाभुत सुविधेअंतर्गत शेतकरी गटांना दोन कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. सामुदायिक शेतीसाठी मालमत्ता निर्मितीचे प्रकल्प यात आहेत. सेंद्रीय पध्दतीने कृषी निविष्ठा निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतकरी गटांनी 10 ते 15 गावांत सेंद्रीय शेती प्रकल्प उभारावा, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यशाळेची सुरवात झाली. बैठकीला तालुका कृषी अधिकारी, कृषी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.