तहसीलदारांनी पूरप्रवण गावांमध्ये सतर्कतेच्या सूचना गावकऱ्यांना द्याव्यात  – जिल्हाधिकारी संदीप कदम

तहसीलदारांनी पूरप्रवण गावांमध्ये सतर्कतेच्या सूचना गावकऱ्यांना द्याव्यात  – जिल्हाधिकारी संदीप कदम

· नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना

· जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

भंडारा, दि. 13 : गेल्या 24 तासात भंडारा जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व भारतीय हवामान विभागाने दिलेला ऑरेंज अलर्ट, धापेवाडा बॅरेज मधून सोडण्यात आलेले पाणी व नजीकच्या गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे येणारे पाणी यामुळे भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची तातडीने आढावा बैठक घेतली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले की, सध्या सर्वदूर पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदीकाठच्या व पूरप्रवण 130 गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा वेळोवेळी आपत्ती विषयक असणारी माहिती तहसीलदारांनी गावकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी प्रवास करणे टाळावे तसेच पाऊस पडत असताना पूलांवरून वाहनांद्वारे वाहतूक करणे टाळावे. जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहेत. मात्र नदीकाठच्या गावांमधील गावकऱ्यांना वाढलेल्या पूर पातळीची कल्पना वेळोवेळी तहसीलदारांनी पब्लिक अॅड्रेस सिस्टीमद्वारे द्यावी.

गोसीखुर्द धरणाची 33 दारे घडण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळीत देखील वाढ होत असून दर तीन तासांनी पाणी पातळीच्या बाबतीतील अद्ययावत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी सजग व संपर्कात रहावे.

अफवांवर विश्वास ठेवू नये

आपत्ती संदर्भातील कोणतीही माहिती असल्यास तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवावी. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की, नागरिकांनी पूर आपत्ती याबाबतीतील अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दूरध्वनी क्रमांक 07184-251222 वर संपर्क साधावा.