चंद्रपूर महानगरपालिकेत साजरा करण्यात आला डॉक्टर्स डे

चंद्रपूर महानगरपालिकेत साजरा करण्यात आला डॉक्टर्स डे

मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

चंद्रपूर १ जुन – कोरोना महामारीच्या काळात चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व वैद्यकीय स्टाफ यांनी कोरोना योद्धा म्हणून सतत कार्य केले आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती – आहे व ते ती समर्थपणे पार पाडतात याचा आम्हाला अभिमान असल्याचे गौरवोद्गार आयुक्त राजेश मोहिते यांनी डॉक्टर्स डे दिवशी आरोग्य विभागास संबोधित करतांना काढले.

कोरोना महामारीच्या काळात जेव्हा कोरोना लागण होऊ नये म्हणुन अनेक निर्बंध होते तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील लोक सतत सेवारत होते. आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन इतर सर्वांची काळजी घेण्यास जी प्रचंड इच्छाशक्ती लागते ती आपल्या डॉक्टर्स मध्ये आहे. म्हणुनच आपण कोरोनाच्या ३ लाटा थोपवु शकलो आहोत. संभावित चौथी लाट आल्यास पुन्हा त्याच जिद्दीने सर्वांना कार्य करायचे आहे.

कोरोना लसीकरणात सुद्धा आरोग्य विभागाने नियोजनबद्ध कार्य केले आहे. मनपाचे सातही प्राथमिक आरोग्य केंद्रे सातत्याने सेवा देत आहेत. आज केवळ डॉक्टर्स डे म्हणुन नाही इतर सर्व दिवशी वैद्यकीय यंत्रणा जी कार्य करते ते निश्चितच उल्लेखनीय असते. या डॉक्टर्स डे निमित्त सर्व वैद्यकीय यंत्रणेचे आभार व शुभेच्छा.

या प्रसंगी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, इतर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा सत्कार आयुक्त राजेश मोहिते तसेच अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.