‘माझी वसुंधरा अभियान’ जिल्ह्यातील आनंदवन ग्रामपंचायत नागपूर विभागात प्रथम

‘माझी वसुंधरा अभियान’ जिल्ह्यातील आनंदवन ग्रामपंचायत नागपूर विभागात प्रथम

चंद्रपूर, दि. 15 जून : मानवाची निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी तसेच पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारीत उपाययोजना करून निसर्गपूरक जीवनपध्दतीचा अवलंब करण्यासाठी सन 2021 – 22 पासून ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नर्सरीची निर्मिती करणे, हिरवेगार क्षेत्र तयार करणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, पाण्याचे नियोजन करणे, अपारंपरिक उर्जा स्त्रोत्रांचा वापर, हवेची गुणवत्ता राखणे आदी पर्यावरणपूरक कामे करण्यात येतात. ही कामे उत्कृष्ट पध्दतीने केल्यामुळे वरोरा तालुक्यातील आनंदवन ही ग्रामपंचायत नागपूर विभागात अव्वल ठरली आहे.

‘माझी वसुंधरा’ अभियानात जिल्ह्यातील एकूण 32 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यात ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसेच शोषखड्यांची निर्मिती, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जमिनीत मुरविणे आदी बाबी उत्कृष्टपणे राबविल्या. यात वरोरा तालुक्यातील आनंदवन या ग्रामपंचायतीने नागपूर विभागात बाजी मारून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले आहे. विशेष म्हणजे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांना पर्यावरण मंत्रालयाकडून जागतिक पर्यावरण दिनी गौरविण्यात आले. अभियानात सहभागी ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे यांनी संबंधित गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, नोडल अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सचिव आदींची अभिनंदन केले आहे.

काय आहे ‘माझी वसुंधरा’ अभियान : निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल कार्य करीत आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण आदी बाबींवर कार्य करणे. वायू तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून वायू प्रदुषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. जलतत्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे. अग्नी तत्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत करणे व ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रोत्साहन देणे. अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेताचे बांध यासारख्या जागेवर नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आदी बाबींचा समावेश आहे.