शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी Ø सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी

Ø सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 मे : पुढील महिण्यात होणाऱ्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाची पेरणीपुर्व उगवणक्षमता तपासणे  गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता तपासून घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमतेची तपासणी, चाचणी करणे गरजेचे आहे. त्यावरून  चांगल्या  उगवण  क्षमतेची  खात्री  पटू शकते. त्यामुळे पेरणी करतेवेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबाबत अंदाज येऊ शकतो. शेतकऱ्यांनी घरच्या घरीच उगवण क्षमतेची चाचणी करावी व चाचणी पूर्वी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान व खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवणक्षमता चाचणीसाठी निवडावे.

अशी आहे उगवणक्षमता तपासण्याची प्रक्रिया :

  वर्तमानपत्राचा एक कागद घेवून त्याला चार घड्या पाडाव्यात. त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पुर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येक दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशारीतीने 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार कराव्यात.  नंतर या गुंडाळ्या पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 60 असेल तर उगवणक्षमता 60 टक्के आहे, असे समजावे. जर ती संख्या 80 असेल तर उगवणक्षमता 80 टक्के आहे असे समजावे. अशा पध्दतीने घरच्या घरी उगवणक्षमतेचा अंदाज घेता येतो.

सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे 70 टक्केपेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणीसाठी प्रति हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे. शेतकऱ्यांनी स्वतः कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता उपरोक्त पद्धतीने घरच्या घरी तपासून नंतरच अशा बियाण्याची पेरणी करावी. उगवणक्षमता 70 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास त्याच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. ऊगवणक्षमतेच्या प्रमाणात पेरणीसाठी किती बियाणे लागेल हे काढण्यासाठी 70 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30 किलो प्रती एकर बियाणे आवश्यक आहे. 69 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30.5 किलो प्रती एकर, 68 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31 किलो प्रती एकर, 67 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31.5 किलो प्रती एकर, 66 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32  किलो प्रती एकर, 65 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32.5 किलो प्रती एकर, 64 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33 किलो प्रती एकर, 63 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33.5 किलो प्रती एकर, 62 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34 किलो प्रती एकर, 61 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34.5 किलो प्रती एकर, 60 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 35 किलो प्रती एकर, उगवण क्षमतेनुसार बियाणांची आवश्यकता लागेल.

रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपुर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशी रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी पुरेशी ओलीवर आणि 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी दर 70 किलोवरून 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॅटरच्या सहाय्याने रूंद वरंबा सरी पध्दती (बी.बी.एफ) यंत्राने पेरणी केल्यास निविष्ठा खर्चात बचत  होत असल्याचे व उत्पादनात सर्वसाधारणपणे 20 ते 25 टक्के वाढ होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. पेरणीपुर्वी सोयाबीन उगवणक्षमता, बीजप्रक्रिया इत्यादी प्रात्यक्षिके प्रत्येक गावात आयोजित करावीत. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागाने  दिलेल्या सुचनाचा अवलंब करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.