अन्न व्यावसायिकांना फॉसकॉस प्रणालीवर मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करण्याचे आवाहन

अन्न व्यावसायिकांना फॉसकॉस प्रणालीवर मोबाईल क्रमांक व

ई-मेल आयडी अद्ययावत करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 18 एप्रिल : सद्यस्थितीत सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात येणारे अन्न परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केल्यावर प्राप्त होतात. परंतु, बऱ्याच वेळा अर्ज करतांना मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी हा स्वतःचा न देता इतर व्यक्तीचा दिला जातो. तसेच बहुतांश वेळेस भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी क्रमांक बदललेला असतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तथा अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांच्याद्वारे पाठविण्यात आलेल्या सूचना, कायदेशीर नोटीस, नोटिफिकेशन, सुधारणा नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, कायदेशीर पेच उद्भवू शकतो. तसेच कायद्यात नवीन तरतुदींबद्दल माहिती मिळत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक, परवाना, नोंदणीधारक यामध्ये खाद्यपदार्थ उत्पादक, रीपॅकर, घाऊक व किरकोळ विक्रेते, वितरक, हॉटेल, रेस्टॉरंट, व्यवसायिक, फिरते विक्रेते व इतर अन्न व्यावसायिकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करून घ्यावेत. त्यासाठी चंद्रपूर,अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा. सदर अर्जासोबत परवाना, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड सोबत जोडावे. अन्न व्यावसायिकांचे अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्यावर त्वरित त्यांची माहिती अद्ययावत करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी कळविले आहे.