महाराष्ट्र राजपत्रित महासंघ जिल्हा कार्यकारिणीची बैठक 

महाराष्ट्र राजपत्रित महासंघ जिल्हा कार्यकारिणीची बैठक 

चंद्रपूर, दि. 16 मार्च : महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या जिल्हा कार्याकारिणीची बैठक महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत साफल्य सभागृहात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)  श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, डॉ. सुचिता धांडे, लेखाधिकारी प्रिती खारतुंडे, डॉ. रक्षमवार, डॉ. शंतिदास लुंगे, समीर भाटकर, सुदाम टावरे, अरुण तिखे  आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रशासनातील ऐतिहासिक असे निर्णय महासंघाने संघटन कौशल्याने प्राप्त केले आहे. यात पाच दिवसांचा आठवडा, 10,20,30 आश्वासित प्रगती योजना, घरभड्यासह सातवा वेतन आयोग, अधिकाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीची तरतूद, घरबांधणी अग्रिमात भरीव वाढ, बालसंगोपन रजा, मारहाण दमबाजी विरुद्ध सक्षम कायदा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता व थकबाकी, कोविड काळात कोविड योद्धा अधिकाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच यांचा समावेश आहे.

    महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या महिला सहसचिव डॉ. सुचिता धांडे यांनी बालसंगोपन रजा केंद्राप्रमाणे 2 वर्षांची करावी, महिलांना पती पत्नी एकत्रिकरणअंतर्गत बदली धोरणात सुसूत्रता असावी, महिलांना त्यांच्या विभागामध्ये पदस्थापना देण्यात यावी, याबाबत मागणी केली. तसेच सुदाम टावरे यांनी  महासंघाने नवीन इमारतीसाठी घेतलेले  प्रयत्न, मिळालेला निधी आणि झालेला खर्च याबाबत माहिती दिली. यावेळी इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा नवीन इमारतीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथे यांनी तर संचालन डॉ. कांचन जगताप यांनी केले. तसेच यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात पदसिध्द अध्यक्ष म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मेश्राम, उपध्यक्ष म्हणून उपमुख्य कार्यकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, कोषाध्यक्ष म्हणून श्री. वडेट्टीवार आणि सचिव म्हणून श्री. थिपे यांचा समावेश आहे.