बचत गटातील महिलांच्या क्रीडा स्पर्धा, प्रदर्शन व विक्रीचे – जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

बचत गटातील महिलांच्या क्रीडा स्पर्धा, प्रदर्शन व विक्रीचे – जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

  • जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

भंडारा, दि 7 : महिला व बालविकास जि.प. भंडारा, महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल सभागृह येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 7 व 8 मार्च या दोन दिवसीय बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याची विक्री व प्रदर्शनीचे व महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनिषा कुरसुंगे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रत्येक विक्री व प्रदर्शनी स्टॉलला भेट देऊन बचत गटातील महिलांचे कौतुक केले निर्मिती करण्यात आलेल्या वस्तूंची माहिती जाणून घेतली. तसेच तालुकानिहाय महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेल्या टीमचे अंतिम सामने अखिल सभागृह येथे आयोजित करण्यात आले. या सामन्यातील महिला खेळाडूंनाही जिल्हाधिकारी यांनी प्रोत्साहन दिले. याप्रसंगी महिला व बालविकास जि. प., महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व उमेदचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महिला खेळाडू व बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.