स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऐतिहासिक बावडी विहीर येथे दिपोत्सव Ø इको – प्रो तर्फे ‘आपला वारसा आपणच जपुया’ उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

ऐतिहासिक बावडी विहीर येथे दिपोत्सव

Ø इको – प्रो तर्फे ‘आपला वारसा आपणच जपुया’ उपक्रम

चंद्रपूर दि. 5 मार्च :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील बाबूपेठ येथील मराठा चौकस्थित गोंडकालीन ऐतिहासिक बावडी- विहीर येथे इको-प्रो तर्फे ‘आपला वारसा, आपणच जपुया’ या उपक्रमांतर्गत दिपोत्सव साजरा करून प्राचीन विहिरी संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या मोहिमेंतर्गत ऐतिहासिक बावड़ी विहिरीची स्वच्छता करण्यात आली. चंद्रपूर शहरात अनेक पुरातन वास्तू  येथे आहेत. सदर विहीर ही गोंडकालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून येथे नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. यावर मोठी-मोठी झाडे उगवल्याने विहिरीची तुटफुट होत असल्याने आणि कचरा टाकण्यात आल्याने इको-प्रो ने यापूर्वी सुद्धा तीन वेळा विहिरीची सफाई केली आहे. मागील चार-पाच दिवसांत विहिरिच्या भिंतीतून निघालेले अनावश्यक झाडे कापून पायऱ्यांची स्वच्छता व पाण्यातील कचरा काढण्यात आला. यानंतर प्राचीन वारसा संवर्धन विषयी व्यापक जनजागृती व्हावी म्हणून दिपोत्सव’ साजरा करण्यात आला.

सदर विहिरीच्या संरक्षण व संवर्धनाकरीता विहिरीला जाळी लावणे, पाणी उपसा करणे व जनजागृती फलक लावण्याकरीता स्थानिक प्रशासनकडे मागणी केल्याचे इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सांगितले. तसेच परिसरातील नागरिकांनीसुध्दा विहिरीचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘हात लगे निर्माण में’ उपक्रमात युवकांनी पुढे यावे : आजच्या युवा पिढीला पर्यावरण, वन-वन्यजीव, पुरातत्व वास्तु संवर्धन, रक्तदान, आपातकालीन व्यवस्थापन आदी क्षेत्रासह ऐतिहासिक वास्तु संवर्धनाकरीता प्रेरित करण्यात येत आहे. तसेच श्रमदानातून या स्थळांचा वारसा जपण्याचे काम सुरू असून यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इको – प्रो संस्थेने केले आहे.