‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या डॉक्टरांचा मोफत सल्ला लाभ घेण्याचे मनपा प्रशासनाने केले आवाहन

‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या डॉक्टरांचा मोफत सल्ला

लाभ घेण्याचे मनपा प्रशासनाने केले आवाहन 

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, ता. ७ :  भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेली कन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्विसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा मार्गदर्शन रुग्णालयात न जाता घरच्या-घरी मिळू शकणार आहे. त्यासाठी ई-संजीवनी ऑनलाइन ओ.पी.डी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

नागरिकांना सी-डॅक या संस्थेकडुन http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावरुन व गुगल प्ले-स्टोर मधुन ई-संजीवनी ओ.पी.डी.अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे थेट तज्ञ डॉक्टरांकडुन उपचार घेता येणार आहे. तसेच वयोवृध्द रुग्ण व ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक नागरीकांना रुग्णालयात पोहचणे अवघड जाते, अशावेळी त्यांना घरी बसुनच वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी याउद्देशाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. रुग्णांना मोफत सल्ला किंवा मार्गदर्शन देण्यासाठी राज्यातून 2 हजार 753 डॉक्टर्स रजिस्टर करण्यात आले आहे. त्यामध्ये 58 तज्ञ डॉक्टर्स चंद्रपूर जिल्हयातील आहेत. थेट तज्ञांची सेवा ई-संजीवनीमुळे घरबसल्या मिळत असल्याने मनपा हद्दीतील जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संकेतस्थळ किंवा एपद्वारे करा नोंदणी : नागरिकांना मोफत ऑनलाईन उपचार घेण्याकरिता http://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.  मोबाईलद्वारे esanjeevaniopd हे एप गुगल प्ले-स्टोर वरुन डाऊनलोड करून नोंदणी करता येईल.

डॉक्टरांचे मिळणार प्रिस्क्रीप्शन : या सेवेद्वारे तज्ञ डॉक्टरांनी उपचारांचा सल्ला दिल्यानंतर एपमध्ये किंवा संकेतस्थळावर त्वरित औषधीचे प्रिस्क्रीप्शन उपलब्ध होईल. या प्रिस्क्रीप्शनची प्रिंट काढून खासगी मेडीकल किंवा शासकीय रुग्णालयातील औषधी विभागामधून औषधी घेता येणार आहे.

ई-संजीवनी ओ.पी.डी.ची वेळ : सकाळी 9.30 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरु राहणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 1.45 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन सुरू राहील. जिल्ह्यात ही सुविधा सर्व रुग्णांकरिता मोफत करण्यात आली आहे.