कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता निर्बंध लागू

कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील

निसर्ग पर्यटनाकरीता निर्बंध लागू

मिथुन मेश्राम सिन्देवाही 9923155166

चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरीता मोठया प्रमाणात पर्यटक येतात. मात्र जंगल सफारी करीत असतांना कोविड अनुरूप वर्तनाचे पालन होत नसल्यामुळे कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता दि. 7 जानेवारी 2022 पासून अंशत: निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमीत केले आहे.

कोव्हीड-19 या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचारी या सर्वांनी लसीकरण केलेले असावे. अन्यथा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. एकाच कुटुंबातील किंवा सोबत प्रवास करणारे, सोबत राहणारे पर्यटकांना प्रचलित नियमानुसार (6 पर्यटक प्रती जिप्सी वाहन) सफारी करता येईल. इतरांसाठी 4 पर्यटक प्रती जिप्सी वाहन यानुसार मर्यादेत सफारी करता येईल.

  कोअर क्षेत्रातील पर्यटन हे मंगळवार व बफर क्षेत्रातील पर्यटन हे बुधवार या दिवशी पूर्वीपासूनच बंद ठेवण्यात आलेले आहे. सर्व प्रवेशव्दारांवर सामाजिक अंतर कटाक्षाने पाळण्यात यावे. पर्यटन प्रवेशव्दारांवर गर्दी होऊ नये, याकरीता दोन वाहनांमध्ये किमान 15 फुट अंतर ठेवण्यात यावे. शिवाय पर्यटकांना प्रवेश देतांना वाहनांना प्रचलित वेळेच्या अर्धा तास आधी प्रवेश व अर्धा तास आधी बाहेर निघण्याची मुभा राहील. त्यानुसार प्रवेशाकरीता स्लॉटची आखणी करण्यात येईल. जेणेकरून प्रवेशव्दारावर कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही. तसेच प्रवेशव्दारासमोर जिप्सी वाहनाकरीता रस्त्यावर खुणा करण्यात येईल.

प्रवेशव्दारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान हे थर्मल स्कॅनर, ईन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येईल. हे सर्वसाधारण असल्यासच प्रवेश देण्यात येईल. ताप-सर्दी खोकला असलेल्या, आजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अशी लक्षणे असलेल्या व्यक्तीची माहिती नजीकच्या कोव्हीड रूग्णालयात दिली जाईल.

            प्रत्येकाने मास्क लावणे व सोबत रूमाल ठेवणे आवश्यक राहील. मास्कशिवाय प्रवेशव्दारातून प्रवेश दिल्या जाणार नाही. मास्क सोबत घेऊन येण्याची जबाबदारी ही संबंधित वनकर्मचारी, पर्यटक, जिप्सी चालक व मार्गदर्शक यांची राहील.  कोणत्याही परिस्थितीत वापरलेला मास्क, हातमोजे, फेस शिल्ड पाण्याच्या बॉटल्या, इत्यादी साहित्य

वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी सर्वांनी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय कोणालाही जिप्सीमध्ये बसू दिले जाणार नाही. प्रवेशव्दारावर येण्यापूर्वी जिप्सीधारकांनी त्यांच्या जिप्सीमध्ये बसणा-यांसाठी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.

तसेच जिप्सीधारकांनी जिप्सीची प्रवेशव्दारावर येण्यापूर्वी साफसफाई व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात येतील. प्रत्येक वापरानंतर स्वच्छतागृहे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. पर्यटक प्रवेशव्दारावर जिप्सीचे चाके निर्जतुकीकरण करण्याची सुविधा असणार असून तसे करणे बंधनकारक राहील.  भ्रमंतीदरम्यान कोणालाही कोणत्याही कारणास्तव वाहनातून खाली उतरता येणार नाही.  विनामास्क कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही,.सफारीदरम्यान सुध्दा मास्क घालणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

सफारी दरम्यान व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रातसुध्दा वाहनांची गर्दी रोखण्यात यावी. उल्लंघन केल्यास संबंधित जिप्सीचालक तसेच पर्यटकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सफारीनंतर पर्यटक, मार्गदर्शक यांनी प्रवेशव्दारावर थांबून गर्दी करणे प्रतिबंधित राहील व तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. राज्य शासन तसेच या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात नमूद आहे.