चंद्रपूर शहरातील खुल्या भूखंडांवरील घनकचऱ्याची सफाई करण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश – घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपा सुरु करणार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम

चंद्रपूर शहरातील खुल्या भूखंडांवरील घनकचऱ्याची सफाई करण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपा सुरु करणार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम

चंद्रपूर, ता. ०१ डिसें : शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा संकलनाच्या कामाची तपासणी मनपायुक्त राजेश मोहिते यांच्यामार्फत सुरु आहे. त्याअंतर्गत वडगाव प्रभागाची तपासणी केली असता बरेचसे नागरिक व फ्लॅटधारक घंटागाडीमध्ये कचरा न देता खुल्या भूखंडावर कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे निर्माण होत आहेत. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक यांचेसोबत तातडीची बैठक घेऊन कचरा टाकत असलेल्या नागरिकांचा सर्वे करून मनपा उपविधीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. खुल्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरामध्ये सर्व प्रभागात सर्वे करून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्याचे काम प्रभाग शिपायामार्फत सुरु करण्यात आले आहे. नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यामध्ये माहिती शिक्षण, संवाद उपक्रम राबविण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांच्या व्यवहारात बदल घडविण्याचा प्रथम टप्पा मनपा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरु केला आहे. त्यानुसार घनकचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि प्लास्टिक कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करण्याची माहिती नागरिकांना देण्यात येईल. त्यामध्ये होम कंपोस्टिंगद्वारे खतनिर्मिती करणे, सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करणे ( Reuse, Reduce, Recycle), घातक घनकचरा मनपाला सुपूर्द करणे आणि प्लास्टिक कचरा मनपाच्या घंटागाडीला देणे यासंदर्भात जनजागृती करून उद्-बोधन करण्यात येणार आहे.  
 
घनकचऱ्याबद्दल असलेला नागरिकांचा दृष्टिकोन बदलण्याचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी “माझा कचरा, माझी जबाबदारी” मोहीम मनपातर्फे राबविण्यात येणार आहे. आगामी कोविड-१९ ची संभाव्य लाट व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ही मोहीम मनपाने सुरु केली आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून उपद्रव निर्माण केल्यास दोषी नागरिक कारवाईस पात्र राहील यांची नोंद घ्यावी. तसेच नागरिकांनी आपल्या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे आणि आपल्या भागात कचरा घंटागाडी नियमित येत नसल्यास मो. क्र. ७२७६००६७७० वर संपर्क साधावा.