मतदार नोंदणी कार्यात राजकीय पक्षांचे सहकार्य गरजेचे -विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा Ø नवमतदारांनी वोटर हेल्पलाइन ॲपचा वापर करावा

मतदार नोंदणी कार्यात राजकीय पक्षांचे सहकार्य गरजेचे

-विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Ø नवमतदारांनी वोटर हेल्पलाइन ॲपचा वापर करावा

चंद्रपूर दि. 27 नोव्हेंबर: भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, सूचना व प्रतिक्रियांसाठी राजकीय पक्षांचे  सहकार्य गरजेचे आहे,असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक पार पडली,यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी उपायुक्त आशा पठाण, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जनजागृती व्यापक प्रमाणात होत आहे, असे सांगून श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या, 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे तसेच  नावात दुरुस्ती करण्याची संधी पुनरीक्षण कार्यक्रमामुळे प्राप्त झाली आहे. यासाठी या विशेष मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे,व उपलब्ध संधीचा फायदा घ्यावा असे त्या म्हणाल्या.

श्रीमती लवंगारे-वर्मा पुढे म्हणाल्या, राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करावी, आपल्या स्तरावरून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. राजकीय पक्षांनी सहकार्य केल्यास कोणत्या मतदारांचे नाव कुठे आहे याची माहिती मिळणे मतदारास सोयीस्कर होईल. यासाठी या कार्यात राजकीय पक्षांनी सहभागी होऊन सहकार्य करावे.

त्यासोबतच मतदारांनी भारत निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करावा. या ॲपद्वारे नाव नोंदणी, नाव वगळणे, नाव दुरुस्ती करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.  दिव्यांग व्यक्ती, अथवा जे केंद्रावर पोहोचू शकत नाही असे मतदार या ॲपचा वापर करू शकतात. नव मतदार विद्यार्थ्यांनी या मोबाईल ॲपचा वापर करावा. एखादा समूह वंचित असेल तर अशा समूहाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

  अत्यंत महत्त्वाची अशी ही मोहीम असून सर्वांनी आपले नाव मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.