मेरी माटी मेरा देश उपक्रम यशस्वी करू या-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मेरी माटी मेरा देश उपक्रम यशस्वी करू या-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 उपक्रमाच्या पुर्वतयारीचा आढावा

          भंडारा दि.7 : केंद्र शासनाच्यातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारोपानिमीत्त आयोजित’ मेरी माटी मेरा देश’ हा  उपक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर यांनी केले.

       जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या उपक्रमाच्या संदर्भात चर्चा केली. ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले अशा वीरांप्रती कृतज्ञता दाखविण्यासाठी हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे.

       केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’, हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे.  जिल्ह्यामध्ये शहरी भागात  नगरपालिका, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

        आज याबाबत मंत्रालय पातळीवरील ऑनलाईन व्हीसीत जिल्हयातील निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्यासह  अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उमेश नंदागवळी,  जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ -दांदळे,उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत अमृत सरोवर येथे शिलालेख लावणे, पंचप्राण प्रतिज्ञा घेणे, सेल्फी काढणे, वसुंधरा वंदन करणे, वीरांना वंदन करणे, ध्वजारोहण व राष्ट्रगान गायन करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे.

        जिल्ह्याच्या विविध भागात सेल्फी पाँईट उभारून पंचप्राण प्रतिज्ञा घेताना नागरिकांना आपल्या हातात मातीचा दिवा घेऊन प्रतिज्ञा घ्यायची आहे. शाळा, महाविद्यालये व विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्याचे आहे, या सर्व कामांना शासकीय काम न समजता एका उपक्रमाचे स्वरूप द्यावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

    राज्यात व देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 2023, रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज पर्यंत जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम साजरे करण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाचा उपक्रम संपन्न होत असतानाच, केंद्र सरकारने “मेरी माटी, मेरा देश” या एका नविन उपक्रमाची घोषणा केलेली आहे. या घोषणेनुसार प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेणे अपेक्षित आहे.

       या उपक्रमाअंतर्गत अमृत सरोवर, जल स्त्रोताशेजारी शिलाफलक उभारणी, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन,वीरोंका नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम  राबविण्यात येणार आहेत. आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योध्दांच्या समर्पणाचे स्मरण करणे याकरीता विशेष अभियान राबविणे अपेक्षित आहे.

        या अभियानात ग्रामपंचायतस्तरापासून ते नगरपालिकेपर्यंत, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागानी योगदान देणे अभिप्रेत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या अभियानामध्ये प्रत्येक विभागाची भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्य पार पाडावे असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हास्तरावर या उपक्रमाचे समन्वयक व नियंत्रक म्हणून शासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे जबाबदारी दिल्याचेही त्यांनी सांगितले.