लस घेतली नसेल तर ऑटोत प्रवेश नाही मनपाचा निर्णय : ऑटोचालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

लस घेतली नसेल तर ऑटोत प्रवेश नाही

मनपाचा निर्णय : ऑटोचालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

चंद्रपूर, ता.१९ : एका दिवशी एका ऑटोतून अनेक जण प्रवास करतात. एखाद्या प्रवाशाला आजार असेल, कोरोनाची लक्षणे असतील, हे सांगता येत नाही. अशावेळी कोरोनाचा ‘सुपरस्प्रेड‘ झाल्यास सर्वांचे जीवन धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे असल्याने लस घेतली नसेल तर ऑटोत प्रवेश नाही, असा निर्णय मनपाने घेतला आहे. चंद्रपूर शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी ऑटोचालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
 
कोविड लसीकरण १०० टक्के करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने नियोजन केले आहे. १२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लकी ड्रॉ सारखी योजनाही घोषित करण्यात आली आहे. मनपाचे कर्मचारी घरोघरी आणि सेवापुरवठादार यांच्याकडे जाऊन लोकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करीत आहेत. या मोहिमेस यशस्वी करण्यासाठी ऑटोरिक्षा चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.

शहर वाहतुकीत ऑटोचालकांची भूमिका महत्वाची असून, अनेक प्रवाशासोबत त्यांचा जवळून संबंध येतो. त्यासाठी ऑटोचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लस घेतली पाहिजे. ऑटोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही लसीकरणासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी केले. बैठकीला मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गलवार, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक श्रीनिवास जेल्लावार यांच्यासह विदर्भ ऑटो चालक मालक कामगार संघटना, महाराष्ट्र ऑटो चालक मालक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.



ऑटोवर लागणार लाल आणि हिरवे स्टिकर

लोकांच्या सतत संपर्कात असलेल्या ऑटोचालकांची कोरोना लस प्रमाणपत्र तपासणी करण्यात येणार आहे. ज्या चालकांनी लस घेतली नाही, त्यांच्या ऑटोना लाल, तर लस घेतलेल्या चालकाच्या ऑटोला ठिकाणी हिरव्या रंगाचे स्टिकर लावण्यात येत आहेत.