कौशल्य प्रशिक्षणातून उद्योगांना मिळणार कुशल मनुष्यबळ / सेंटर फॉर इन्वेंशन, इनोव्हेशन, इंक्यूबेशन प्रशिक्षण केंद्र सुरू

कौशल्य प्रशिक्षणातून उद्योगांना मिळणार कुशल मनुष्यबळ
सेंटर फॉर इन्वेंशन, इनोव्हेशन, इंक्यूबेशन प्रशिक्षण केंद्र सुरू

गडचिरोली, दि.26 : गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हयामध्ये उद्योग आधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी व इंडस्ट्री 4.0 च्या अनुषंगाने, जिल्हयातील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास करण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर इन्वेन्शन, इनोवेशन, इन्क्युबेशन अँण्ड ट्रेनिंग (CIIIT) या प्रशिक्षण केंद्राची उभारणी जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नोलोजी यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. युवकांनी रोजगार मिळविण्याकरिता या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरु प्रशान्त बोकारे केले आहे.
सेंटर फॉर इन्वेन्शन, इनोवेशन, इन्क्युबेशन अँण्ड ट्रेनिंग सेंटरमध्ये १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ४० विद्यार्थ्यांच्या प्रथम बॅचच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाकरिता कुलगुरू प्रशान्त बोकारे, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, विज्ञान व तंत्राज्ञान शाखेचे डॉ. अनिल चिताडे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, टाटा टेक्नोलोजीचे श्री कोहली आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी जिल्ह्यात उच्च दर्च्याच्या आणि आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे प्रशिक्षण केंद्र शासनच्या वतीने उभारण्यात आलेल्या सांगून सदर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्याकरिता पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना रोजगाराधारित प्रशिक्षण देवून त्यांना उपजीविकेच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आणि यातून जिल्ह्याचा विकास साधून गडचिरोलीचे मागासलेपण आणि नक्षली विचारसरणीला आला घालणे एवढाच जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व युवकांनी या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन त्यांनी केले.
उद्योग आधारित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी १८ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नोलॉजी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. सदर प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण नोहेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आलेले होते. या प्रशिक्षण केंद्रात उद्योग जगताच्या गरजेनुसार अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य विकासाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना नऊ वेगवेगळया तांत्रिक प्रयोग शाळांच्या माध्यमातुन प्रशिक्षित केले जाईल व यांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी, गडचिरोली व गोंडवाना विद्यापीठ यांच्या मार्फत करण्यात येईल. या केंद्रामध्ये आधुनिक यांत्रिक उपकरणे, रोबोटिक लाईन, असेंबली लाईन, विद्युत आधारित वाहने (Battery Operated Vehicles) वाहनांचे विविध भाग, यांच्या डिझाईन व उत्पादन या बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
“ नेहमीच आदिवासी, मागास आणि नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. परंतू सद्यस्थितीत गडचिरोली जिल्हा हा मोठ्या प्रमाणात उद्योग गुंतवणूक आकर्षित करीत आहे. या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असणार आहे. अशी परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासन गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध कौशल्य विकास योजना राबवीत आहे. डिजिटल शिक्षणाकरिता अल्फा अकॅडेमी, उद्योगाधारित प्रशिक्षणाकरिता सेंटर फॉर इन्वेन्शन, इनोवेशन, इन्क्युबेशन अँण्ड ट्रेनिंग (CIIIT) प्रकल्प कार्यरत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना प्रशिक्षण देवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि याकरिता शाश्वत इकोसिस्टम तयार करणे यावर जिल्हा प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे.” असे संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी सांगितले.