मतदार जनजागृती करिता जिल्हा प्रशासनातर्फे सायकल रॅलीचे आयोजन

मतदार जनजागृती करिता जिल्हा प्रशासनातर्फे सायकल रॅलीचे आयोजन

चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर: 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 18 ते 19 वयोगटातील जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदार यादीतील नावाची दुरुस्ती करणे, दुबार, स्थलांतरित व मयत असलेल्या नावाची वगळणी करणे याकरिता दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज, दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथून सुरुवात होणार असून सदर रॅली जटपुरा गेट- गिरणार चौक- गांधी चौक- जटपुरा गेट- डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय- वरोरा नाका- सिद्धार्थ हॉटेल समोरून परत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे येऊन सांगता होणार आहे. या मतदार जनजागृती करीता सायकल रॅलीमध्ये नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.