महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत

पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

भंडारा, दि. 8 : राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात  1 हजार 52 खाती आधार प्रमाणिकरणासाठी शिल्लक आहे. यापैकी 882 सभासदांची यादी विशिष्ट क्रमांकासहीत शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली असून सर्व याद्या बँकस्तरावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहे. संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाच्या यादीमध्ये नाव प्रसिध्द झाले असल्यास यादीमध्ये नमुद विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड व बचत खाते पासबुक घेऊन बँक शाखेमध्ये किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन 15 नोव्हेंबर 2021 पूर्वी न चुकता आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 34 हजार 609 कर्जखाती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 33 हजार 8 कर्जखाती विशिष्ट क्रमांकासहीत प्राप्त झालेली आहे. विशिष्ट क्रमांकासहीत प्राप्त झालेल्या यादीपैकी 31 हजार 956 सभासदांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे. त्यापैकी 31 हजार 149 सभासदांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रुपये दोन लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे, असे सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे.