तुरिले सरांच्या कृतार्थ जीवनाचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा : डॉ.चंद्रमोहन गुप्ता

तुरिले सरांच्या कृतार्थ जीवनाचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा : डॉ.चंद्रमोहन गुप्ता

भंडारा, ब्युरो. शेकडो क्रियाशील विद्यार्थी कार्यकर्ते, सहयोगी, कुटूंबिय, मित्र यांच्या उपस्थितीत प्रा. वामन तुरिले यांच्या 82 व्या वर्षातील पदार्पण सोहळ्यात बोलताना, इंडियन रेडक्रॉस संस्थेचे मानद सचिव तसेच ज्येष्ठ डॉ.चंद्रमोहन गुप्ता म्हणाले, आज तुरिले यांच्या उत्साही, चैतन्यमन अशा कृतार्थ जीवनाचा जीवनपट उलगडतांना त्यांच्या अभिनव व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते.
पुढे बोलताना डॉ. गुप्ता म्हणाले, तुरिले यांनी युथ रेडक्रॉस, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रीन क्रॉस, संस्कार इ. चळवळीतून हजारो विद्यार्थी घडविले. यशस्वी प्राध्यापक, पत्रकार आणि समाजसेवी म्हणून ते अग्रेसर राहिले. शिक्षणक्षेत्रातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पत्रकारितेचा दर्पण पुरस्कार यांनी ते गौरविण्यात आले आहेत. राष्ट्रीय सेवा योजना, संस्कार चळवळ, गांधी जीवन व विचार परिक्षा या माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यांच्या मनात सामावले गेले आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी माजी प्राचार्य प्रतिमा थोटे यांचे स्वरचित गौरवगीत व ओवाळणी सोहळा झाला. संचालन माजी विद्यार्थी नितीन कारेमोरे यांनी केले. संस्कार चळवळीच्या आधारस्तंभ स्मिता गालफाडे यांनी शिबिराच्या आनंदोत्सवात विद्यार्थी कसे घडतात, याची माहिती दिली. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे चेतन भैरम, तसेच पॉलिटिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक गजानन जानभोर यांनी तुरिले सरांच्या निर्भीड व तटस्थ पत्रकारिता व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रा. आरती देशपांडे यांनी कॉलेजमधील विविध प्रसंग सांगून तुरिले सरांच्या संवेदनशील व समर्पित व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन दिली. विशाखा गुप्ते आणि माजी शिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे, महेश रणदिवे, प्राचार्य डॉ. दीपा भुरे यांनी काही हृदयंगम आठवणी सांगितल्या.
तुरिले सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे गांधी- आंबेडकर विचारमंचाचे हर्षल मेश्राम ‘अशा कथा, अशी पुस्तके’ चळवळीचे प्रा. अरुण रंधे, ज्येष्ठ रंगकर्मी व विचारवंत नीळकंठ रणदिवे यांनी तुरिले सरांच्या सेवाकार्याच्या असिधाराव्रतावर प्रकाशझोत टाकला. सरांचा मुलगा साहिल आणि सून श्रद्धा यांनी कौटूंबिक जीवनातील त्यांना स्वानुभावातून उलगडलेले ‘बाबा’ आपल्या भावनोत्कृष्ट शब्दांद्वारे उभे केले. सरांच्या पत्नी नलिनी तुरिले यांनी बिकट परिस्थितीत, वेळोवेळी मदतीला धावून आलेल्या विद्यार्थी तसेच कार्यकर्त्यांची आपल्या धन्यवादाच्या भाषणातून दखल घेतली. सत्कारमूर्ती प्रा.वामन तुरिले यांनी आपल्या काही आठवणी सांगत, निष्क्रिय न राहता, जमेल ती सेवा, समाजाला देऊन समाधानाचे सुख मिळवा, असा संदेश दिला. मी आज अत्यंत सुखी, आनंदी आणि समाधानी आहे, असेही ते म्हणाले, याप्रसंगी जे.एम.पटेल महाविद्यालयात रक्तदान चळवळीला अतिशय उंचीवर पोहोचविणारा 1984-85 बॅचचा हरिकिशोर दिवटे आणि शिबिरातील मुलींना मायेने जपणाऱ्या वयोवृद्ध कौसल्या शर्मा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख ज्येष्ठ डॉ.डी.यू, तुरस्कर, डॉ.शरदराव व्यवहारे, डॉ. अशोकराव ब्राह्मणकर, डॉ. रवींद्र टामने, ज्येष्ठ सनदी लेखापाल बालकिसनजी लाहोटी, अॅड. सुधीर गुप्ते, प्रा. हिंमतलाल पारधी, प्रा. रमेश सुपारे, अश्विनीकुमार पशिने, कृष्णकुमार बत्रा, स्तंभलेखक व पत्रकार खिमेश बढिये, डॉ.आयलवार, प्रा.नरेश आंबिलकर, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश खोब्रागडे, योग कार्यकर्त्या संध्या बांते, प्राचार्य रंजना दारवटकर, माजी नगराध्यक्ष रामदास शहारे, अल्का कठाळे, छाया कावळे, प्रा. डॉ.जयश्री सातोकर, मो.सईद शेख, डॉ.विजय रोकडे, प्राचार्य सुनिता जांगळे, संपादक हिवराज उके, प्रा. भावना इनकने, प्रणय कुथे उपस्थित होते.