महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा

एकत्रित आराखडा तयार करावा

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई विद्यापीठात शाहीर अमरशेख जयंती समारंभाचे उद्घाटन

 
            मुंबईदि. 20 : महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. महाराष्ट्राच्या मातीत परंपरेने रुजलेल्या अनेक कला आहेत. देशपातळीवर  महाराष्ट्राचे नाव अभिमानाने-गौरवाने घेतले जाईल, अशी लोककला आपण जपली पाहिजे. त्यासाठी लोककलेचा विभागानुसार एकत्रित आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
            मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, भारत सरकार आणि शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी संगीत विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शाहीर अमरशेख जयंती समारंभाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते.
             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणालेआपली संस्कृती, लोककला  विद्यापीठांनी जपली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक मोठ्या ताकतीचे कलावंत आहेत. त्यांच्या कलेला योग्य ठिकाणी संधी देऊन अधिकाधिक लोकांपर्यत ती कला कशी पोहोचेल याचे योग्य नियोजन केले पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणे जसे आवश्यक आहे, तसेच आपली बहुमोल संस्कृती टिकविणे देखील तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी आपली लोककला जिवंत राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे.
            राज्याच्या लोककलेचा सर्वसमावेशक आराखडा लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी तयार करावा. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही करण्यात येईल, असे आश्वासनही श्री.सामंत यांनी यावेळी दिले.
            यावेळी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रउदयपूरचे निदेशक सोनी गुप्ता, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. विनोद पाटील, मानव्यविद्या मुंबई विद्यापीठ अधिष्ठाता डॉ.राजेश खरात, प्रख्यात सिने-नृत्य दिग्दर्शिका श्रीमती फुलवा खामकर, शाहीर अमरशेख अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे उपस्थित होते.