मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Ø नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन

मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Ø नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 18 ऑक्टोबर : आगामी होणाऱ्या सार्वत्रिक, पोटनिवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरीता तसेच नावात दुरुस्ती, मय्यम, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांना वगळणे, हरकती स्वीकारणे तसेच नवीन मतदार नोंदणी करण्याकरीता मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम 2022 जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहे. ज्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे, अशा उमेदवारांची नावे  मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा उमेदवारांनी फार्म क्रमांक 6 भरून द्यावा.
1 नोव्हेंबर 2021 रोजी 75- वरोरा विधानसभा मतदार संघातील 333 मतदार केंद्रावर तसेच तहसील कार्यालय, वरोरा व भद्रावती येथे प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक आणि निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
तरी, 75- वरोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी आपले यादीतील नावे पाहून घ्यावे. तसेच मतदार यादीमध्ये काही उणीवा असल्यास आपले मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. विशेषतः ज्या मतदारांचे वय 1 नोव्हेंबर 2022 रोजी 18 वर्ष होत आहे. त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी केले आहे.