जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर

मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाचे मुंबई येथे 28 जुलै 2019 रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवसाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले. राज्यात 9 मॉडेल ट्रीटमेंट सेंटर व 27 औषधोपचार केंद्र प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरू करण्यात आले. त्यासोबतच कावीळ या रोगाचे निदान, उपचार तथा प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहे.
या राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  जिल्ह्यातील नागरिकांना कावीळ अ, ब, क,ड आणि ई च्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याअंतर्गत हिपॅटायटीस रुग्णांचे निदान करणे, संक्रमण थांबविणे, समुपदेशन करणे, रुग्णांचे निदान करून उपचार करणे याबाबींचा सेवा नियमितपणे सुरू करण्यात आल्या आहे.
अतिजोखमीच्या नागरिकांचे तथा रुग्णालयाशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांचे हिपॅटायटीस  ब आणि क साठी रक्त तपासणी करून जर निगेटिव्ह आल्यास त्यांचे लसीकरण करणे. वायरल हिपॅटायटीस हा संसर्गजन्य आजार असून या आजाराच्या उपचारासाठी महागडे औषध शासनाने विनामूल्य जनतेस उपलब्ध करून दिले असून औषधांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या हस्ते रुग्णांना प्रत्यक्षपणे औषधांची पहिली मात्रा देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनंत हजारे, डॉ. प्रविण धडसे, सर्जन डॉ. विक्रांत गावंडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. दीप्ती श्रीरामे टाटा ट्रस्टचे आशिष बरबडे यांची उपस्थिती होती.