उर्वरित नागरिकांना लवकरच अमृतचे नळ कनेक्शन 

उर्वरित नागरिकांना लवकरच अमृतचे नळ कनेक्शन 

– महापौर राखी संजय कंचर्लावार यांची माहिती

– तुकूम येथे अमृत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ 

चंद्रपूर, ता. ०५ : केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन  ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजनेच्या झोन २ मधील तुकूम प्रभागातील सुमारे ३० हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी २०.२० लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. सध्या या भागातील ३ हजार ८७४ नळधारकांना कनेक्शन देण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना लवकरच कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.

मंगळवारी, ( ता. ५ ) अमृत योजनेच्या झोन क्र. २ मधील तुकूम द्वारकानगरी येथे अमृत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, सभागृह नेता संदीप आवारी, झोन २ चे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया उईके, नगरसेविका शिला चव्हाण, महिला व बालकल्याण उपसभापती पुष्पा उराडे, नगरसेवक सोपान वायकर, प्रशांत भारती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी महेशनगर आणि द्वारकानगरी येथे नळाचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर स्थानिक जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडला.  
महापौरपदाच्या पहिल्या कार्यकाळात स्वच्छतेचा विडा उचलत शहरात कचऱ्याच्या विल्हेवाटीकरिता घंटागाडीची सुरुवात केल्याची आठवण सौ. राखी कंचर्लावार यांनी सांगितली. रेनवॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपणावर भर देण्याचे आवाहन देखील महापौरांनी उपस्थित नागरिकांना केले. कार्यक्रमात उपमहापौर राहुल पावडे यांचेही भाषण झाले. अमृत योजनेच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना अव्याहतपणे पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम पूर्ण झाले असून, टप्याटप्याने लोकार्पण सोहळा होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी, तर संचालन मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी केले.