अन्न व औषध प्रशासनाकडून 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष परवाना व नोंदणी मोहीम

अन्न व औषध प्रशासनाकडून 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष परवाना व नोंदणी मोहीम

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाद्वारे विशेष परवाना व नोंदणी मोहीम दि. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2021  या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्व अन्न व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घेऊन ज्यांच्याकडे परवाना, नोंदणी प्रमाणपत्र नाही त्यांनी नव्याने परवाना व नोंदणी प्रमाणपत्र काढून घ्यावे. अन्न परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त न करता अन्न व्यवसाय केल्यास शिक्षेची तरतुद असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी दिली.
 केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्रधिकरण, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोणताही अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी आपले बिल, ईनव्हाइस,चालान यावर अन्न परवाना, नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक नमूद करणे बंधनकारक केले आहे. सदर अधिसूचना दि. 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू करण्यात येत आहे.
केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्रधिकरण, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेबद्दल सर्व अन्न व्यावसायिकांना माहिती व्हावी, याकरीता अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते
यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  सदर बैठकीमध्ये विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता. या बैठकीत केंद्रीय अन्नसुरक्षा मानदे प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या अधिसूचनेबद्दल तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यामधील विविध तरतुदी बाबत सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना व अन्न व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील परवाना अट क्रमांक 14 (अन्नपदार्थ खरेदी-विक्री करतांना, अन्नपदार्थाची परवाना अथवा नोंदणीधारक व्यक्तीकडूनच खरेदी-विक्री करावी.) या तरतुदीबद्दल श्री. मोहीते यांनी माहिती देत सदर तरतुदीचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कार्यवाही बाबत अन्न व्यावसायिकांना अवगत केले.