‘सद्गुरू एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न!

‘सद्गुरू एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न!

मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ!

 

एका विलक्षण कथा कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल परब करीत आहे. त्यांनी ‘सून माझी भाग्याची’, ‘छावणी’, ‘चंद्री’, ‘पहिली भेट’ या चित्रपटांसह अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘दिल मलंगी’ या महत्वाकांक्षी चित्रपटाचा मुहूर्त मुंबई, मढ येथील ‘शनाया’ या आलिशान ठिकाणी नुकताच करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी, नारायण जाधव, विनम्र भाबल, निर्माते रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले, प्रमोद मुरकुटे, दिग्दर्शक सुनिल परब यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची कथा प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या सरळमार्गी, स्वप्नाळू सतेज ढाणे पाटील या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्याचं खुल्लम खुल्ला प्रेम होतं…पण ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाईमपास करतेय हे लक्षात आल्यावर ‘प्रेम’ ह्या संकल्पने वरचा त्याचा विश्वास उडतो… साहजिकच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या बळावर तो ‘ग्लोबल ट्रान्स मिडिया’ या जाहिरात एजन्सीचे सर्वेसर्वा हर्षवर्धन मराठे यांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो. मात्र ‘मुंबई नगरी’तल्या दैंनदिन धक्काधकीच्या प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट हर्षवर्धन यांना खटकते, ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरु होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते… उत्कंठा शिगेला पोहोचविणारी ही फँटसी मनोरंजनाचं अनोखं सरप्राईज असणार आहे.

 

दिल मलंगींच्या मुहूर्त प्रसंगी अभिनेता चिन्मय उद्गीरकर म्हणाला, “मी इतक्या मालिकांमधून, चित्रपटातून काम केलंय… लव्हस्टोरीज मधनं काम केलंय पण ‘दिल मलंगी’ चित्रपटाच्या माध्यमातून जी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे ती माझ्या करिअरमधली पहिली हटके लव्हस्टोरी आहे. अशक्य वाटावी अशी ही प्रेमकथा आहे.” चित्रपटाची नायिका अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर म्हणते, “मला मेकअप तसाही कमी करायला आवडतो. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात माझी भूमिकाच अशी आहे की तिथं ‘नो मेकअप लूक’ हा सध्याचा ट्रेन्डिंग लूक मला कॅी करायला मिळणार आहे. जे अगदी माझ्या मनासारखं पहिल्यांदाच घडतंय.”, तर अभिनेत्री मीरा जोशी म्हणाली, ”मी पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहे. यामुळे माझी पडद्यावरची इमेज नक्कीच ब्रेक होणार..”

 

‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ अत्यंत मनमोहक कथा ‘दिल मलंगी’ची असून आजच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक संदेशाची खुसखुशीत झालर असलेले हे मनोरंजन करण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम ऍक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. आघाडीचे लेखक स्वप्निल गांगूर्डे यांची कथा असून पटकथा – स्वप्निल गांगूर्डे, प्रथमेश शिवलकर तर संवाद ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उदगीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, भक्ती रत्नपारखी, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, अपूर्वा गोरे, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत आहेत.

 

निर्माते रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ आणि सुनिल परब दिग्दर्शित ‘दिल मलंगी’ या चित्रपटाचा भव्य कॅनव्हास डीओपी नाना खेडकर आणि सचिन लोखंडे यांच्या सिनेमॅटिकल नजरेतून दिसणार आहे. तो सजविण्यासाठी कलादिग्दर्शक समीर चिटणवीस यांचे सहयोग लाभले आहे. अभिनयासोबतच कार्यकारी निर्मितीची सूत्रे संजीव सत्यविजय धुरी सांभाळत असून निर्मिती व्यवस्थापन दीपक शिंदे यांच्या हाती आहेत. वेशभूषा वंदना राय करीत आहेत तर प्रसिद्ध ऍक्शन डिरेक्टर अझीम भाई शेख यांनी उत्कंठावर्धक स्टंट्स डिझाईन केले आहेत. चित्रपट अधिक गतिवान करण्याची किमया संकलक संजय लोखंडे साधणार आहेत. प्रसिद्ध जाहिरात संकल्पनाकार सचिन डगवाले या चित्रपटाच्या जाहिरात प्रसिद्धीचे डिझाईन करीत आहेत. राहुल काळे या युवा गीतकाराने दिल मलंगीतील गीतरचना केली असून ‘इंडियन आयडॉल’ फेम युवा गायक आशिष कुलकर्णी यांनी संगीतकार म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. लोकप्रिय गायिका आनंदी जोशी, कविता राम, आशिष कुलकर्णी इत्यादी गायकांचा सुरेल स्वर बहार आणणार असून प्रख्यात नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे त्यावर साजेसे नृत्याविष्कार चढवणार आहेत.