युवक कल्‍याणासाठी रचनात्‍मक, संघर्षात्‍मक, आंदोलनात्‍मक कार्यक्रमांची आयोजने करा – आ. सुधीर मुनगंटीवार

युवक कल्‍याणासाठी रचनात्‍मक, संघर्षात्‍मक, आंदोलनात्‍मक कार्यक्रमांची आयोजने करा – आ. सुधीर मुनगंटीवार

भाजयुमो चंद्रपूर महानगर शाखेची बैठक संपन्‍न

भारतीय जनता पार्टीचा विचार युवकांच्‍या मना मनापर्यंत पोचवत त्‍यांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍नांची शर्थ करणे आवश्‍यक आहे. निवडणूका जिंकणे आपले अंतिम लक्ष्‍य नसून ‘पथ का अंतिम लक्ष्‍य नहीं है, सिंहासन चढते जाना, सब समाज को साथ लिये हमको हे आगे जाना’ अशी आपली वाटचाल असली पाहीजे. युवकांचे विविध प्रश्‍न, शासकीय सेवेसाठी वयोमर्यादा वाढवावी, रोजगाराचा प्रश्‍न असे युवकांच्‍या हिताचे विविध प्रश्‍न हाताळत भाजयुमोच्‍या माध्‍यमातुन रचनात्‍मक, संघर्षात्‍मक, आंदोलनात्‍मक कार्यक्रमांची आखणी करावी असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक २५ सप्‍टेंबर २०२१ रोजी भाजयुमो चंद्रपूर महानगर शाखेची बैठक संपन्‍न झाली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना संबोधताना आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, प्रज्‍वलंत कडू, सुनिल डोंगरे, यश बांगडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, ‘‘एकच चर्चा युवा मोर्चा’’ हे ब्रीद तेव्‍हाच पुर्ण होईल जेव्‍हा पक्षाची ध्‍येय – धोरणे घेवून तुम्‍ही युवकांमध्‍ये जाल. युवा मोर्चा हा सर्व समाज, सर्व धर्मातील युवक-युवतींना आपल्‍या हक्‍काचे व्‍यासपीठ वाटेल अशी कृती युवा मोर्चाकडून अपेक्षित आहे. युवा मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांनी तरूणाईचे विविध प्रश्‍न, समस्‍या घेवून संघर्ष करणे आवश्‍यक आहे.
भाजयुमोच्‍या माध्‍यमातुन प्रामुख्‍याने गरीब मुलांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, गरजू दिव्‍यांग युवकांना बॅटरी ऑपरेटेड सायकली देणे अशा उपक्रमांचे आयोजन करणे आवश्‍यक आहे. यासाठी सी.एस.आर. चा उपयोग करता येईल. सर्व जाती धर्मांच्‍या तरूणांना एकत्र आणत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्‍या माध्‍यमातुन पक्षाचा विस्‍तार अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्‍या युवकांसाठीच्‍या योजनांची माहिती युवकांपर्यंत पोहचवत त्‍याचा लाभ युवकांना मिळवून देणे यावर भर देण्‍याची गरज त्‍यांनी प्रतिपादीत केली. पं. दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या एकात्‍म मानववादाला अनुसरून युवकांनी भाजयुमोच्‍या माध्‍यमातुन कार्य करण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले. तर भाजयुमोच्‍या माध्‍यमातुन राबविण्‍यात आलेल्‍या कार्याचा अहवाल प्रज्‍वलंत कडू यांनी सादर केले. बैठकीला भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांची उपस्थिती होती.