नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी

महाज्योतीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार

– बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

 

            मुंबईदि. 28 : बहुजनांच्या शैक्षणिकसामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योतीची निर्मिती केली आहे. या  महाज्योतीच्या माध्यमातून नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मागास बहुजन कल्याण मंत्री मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
            बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या श्रीरंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. याप्रसंगी नेत्रहीन विद्यार्थ्यांनी स्वतः मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रेखाटलेले छायाचित्र भेट स्वरूपात दिले. त्यावेळी ते बोलत होते.
            श्री. वडेट्टीवार म्हणालेश्रीरंग सेवाभावी संस्थेत कार्यरत असणाऱ्या तरुणांनी नेत्रहीन मुलांना गंधातून रंग ओळखून चित्र रेखाटण्याची कला शिकवली आहे. ही कला दुर्मिळ व अप्रतिम आहे.
श्रीरंग संस्था करत असलेले  कार्य उल्लेखनीय आहे. गंधातून रंग ओळखून चित्र रेखाटण्याची कला अवगत झाल्यास गरजू नेत्रहीनांच्या हाताला काम मिळू शकेल. त्यांना आधार मिळेल.  नेत्रहीन बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही कला विकसीत करून महाज्योतीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
            नेत्रहीन विद्यार्थ्यांनी रंगांना गंधातून ओळखून चित्र रेखाटण्याची कला श्रीरंग सेवाभावी संस्थेचे डॉ. सुमित पाटील यांच्याकडून अवगत केली आहे. बहुजन समाजासाठी आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना प्रोत्साहन देऊन दृष्टी बाधित समाजासाठी भविष्यातील एक संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.  
            याप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे  चित्र रेखाटणारे प्रियदर्शिनी सालियन,प्रसाद बालम,आकांक्षा वाकडे ,प्रतिक्षा डोळस आणि शबनम अन्सारीश्रीरंग संस्थेचे डॉ. सुमित पाटील यांना  श्री. विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक मदत केली. यासह संस्था करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.