बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड घरपोच मिळणार Ø कोविड काळात कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी

बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड घरपोच मिळणार

Ø कोविड काळात कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी

चंद्रपूर दि.23 सप्टेंबर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, चंद्रपूर या कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येते. ओळखपत्र तसेच नूतनीकरण पावती घेण्याकरीता कार्यालय परिसरात कामगारांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणीकरीता अर्ज केला आहे व ज्या कामगारांचा अर्ज मंजूर झाला आहे, अशा कामगारांना पोस्टाद्वारे स्मार्ट कार्ड घरपोच पाठविण्यात येईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त राजेश धुर्वे यांनी कळविले आहे.

त्यासोबतच ज्या बांधकाम कामगारांनी ऑनलाइन पेमेंट केले आहे, अशांना पोस्टाद्वारे घरपोच कार्ड पाठवण्यात येईल. ज्या कामगारांनी ऑनलाइन पेमेंट केले नाही, त्यांनी ऑनलाइन पेमेंट त्वरित करून घ्यावे. तसेच नूतनीकरणाचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करून सदर पावती प्रिंट करून घ्यावी व सदर पावतीवर कार्यालयाचा शिक्का घ्यावा.  कामगारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी व नूतनीकरणाचे पेमेंट करण्यासाठी https://bit.ly/3wh5cDP ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ऑनलाइन पेमेंट करते वेळी बांधकाम कामगार असतात काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 07172-252028 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.