औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कायदेविषयक शिबीर संपन्न

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कायदेविषयक शिबीर संपन्न

Ø तज्ञांकडून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

 

चंद्रपूर, दि. 17 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलिस मुख्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन (आज दि. 17) करण्यात आले. अधिवक्ता अमृता वाघ यांनी जेष्ठ नागरीक कायदा 2007 व पालकांचे संगोपन, तसेच माहितीचा अधिकार कायदा 2005 याबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. तसेच घरातील व समाजातील सर्व वडिलधाऱ्या मंडळीच्या आदर व सम्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगीतले. यावेळी पोलीस निरिक्षक लता वाडिवे यांनी तरूण विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी जगतापासुन दुर राहावयास हवे तसेच भविष्यात नोकरी मिळवितांना त्याची अडचण निर्माण होऊ शकते याबाबत तसेच मुलांनी व मुलींनी सर्वप्रथम आपल्या पायावर उभे राहुन आई-वडिलांचे स्वप्न करावे असे महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.

 

सायबर सेलचे मुजावर अली यांनी सायबर क्राईम म्हणजे काय? फेसबुक, व्हॉटस्पअप, इंस्टाग्राम वापरल्यामुळे अजानतेपणे आपल्या हातुन गुन्हा घडु शकतो. तसेच ऑनलाईन फ्रॉड व त्याचे प्रकार स्पष्ट करून त्याबाबतची तक्रार सायबर सेलकडे देण्याचे आवाहन केले. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी बालंकाचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा-2012 व त्यातील सुधारणा 2018 प्रमाणे कायद्यातील संपुर्ण तरतुदी साध्या व सोप्या भाषेत उदाहरणासह स्पष्ट केल्या. तसेच विद्यार्थांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन यशस्वी होण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणा-या सुविधाबाबत उपस्थितांना माहिती दिली. सदर कार्यक्रमात सहायक कार्यक्रम अधिकारी बि. आर. बोढेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना विषद केली. कार्यक्रमाचे संचालन अश्विनी माकोडे तर आभार प्रदर्शन श्रध्दा वाघाडे यांनी मानले.