अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली मूर्तींची पाहणी

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली मूर्तींची पाहणी

 आज होणार मनपाच्या विशेष पथकाद्वारे पाहणी

चंद्रपूर, ता. ९ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेश उत्सवावर भर देण्यात येत आहे. पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी असल्याने विक्री होऊ नये, यासाठी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली. पीओपी मूर्ती विक्री, साठा व खरेदी करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी मनपाचे विशेष पथक पाहणी करणार असून, पीओपी मूर्ती आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे.
 
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे याबाबतीत महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात शहरातील सर्व मूर्तीकार, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्थाची बैठकही घेण्यात आली होती. यात स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मूर्तिकाराची नोंदणी आणि डिपॉझिट बंधनकारक करण्यात आली आहे. दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी कोतवाली वॉर्ड, कुंभार मोहल्ला, बेंगलोर बेकरी या परिसरातील मूर्ती विक्रीच्या ठिकाणी पाहणी केली. मूर्तीची तपासणी करण्यात आली. विक्रेते मूर्ती मातीचीच असल्याची पावती देत असल्याचे आढळून आले. सध्यातरी पाहणीत पीओपी मूर्ती आढळून आली नाही. या पथकात स्वच्छता विभाग प्रमुख अमोल शेळके, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, स्वच्छता निरिक्षक संतोष गर्गेलवार, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.