महिला मोर्चा क्रियाशील होण्‍याकरिता त्रीसुत्राचा अवलंब करा – आ. सुधीर मुनगंटीवार

महिला मोर्चा क्रियाशील होण्‍याकरिता त्रीसुत्राचा अवलंब करा – आ. सुधीर मुनगंटीवार

महिला मोर्चा महानगर व ग्रामीण पदाधिका-यांची बैठक संपन्‍न.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूर महानगर आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रामीण यांची संयुक्‍त संघटनात्‍मक बैठक विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे संपन्‍न झाली. या बैठकीला प्रमुख्‍याने जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, प्रदेश उपाध्‍यक्ष सौ. वनिता कानडे, जिल्‍हा महिला महानगर अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, जिल्‍हा महिला ग्रामीण अध्‍यक्षा कु. अलका आत्राम, महिला बालकल्‍याण समिती जि.प. रोशनी खान, मुलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, माजी उपाध्‍यक्ष (जि.प.) सौ. माधुरी बोरकर, जि.प. माजी सभापती सौ. अर्चना जिवतोडे, राजुराच्‍या माजी नगराध्‍यक्षा विजयालक्ष्‍मी डोहे, महानगर महामंत्री महिला मोर्चा शिला चव्‍हाण यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले की, महिला मोर्चातील प्रत्‍येक पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी आपले बुथ मजबुत करण्‍याकरिता प्रयत्‍नरत रहावे. महिला मोर्चा हे भारतीय जनता पार्टीचा कणा आहे. भारतीय जनता पार्टी ही केवळ पार्टी नसून आपला परिवार आहे. महिला मोर्चा सामर्थ्‍यशाली व्‍हावा यासाठी तीन गोष्‍टींवर भर द्यावा ज्‍यामध्‍ये सक्रीयता, आक्रमकता व क्रियाशिलता असावी. निरनिराळे उपक्रम राबवून बैठकांचे नियोजन करावे, वर्षभराची कार्यक्रम पत्रीका स्‍वतः तयार करून तो कार्यक्रम आक्रमणपणे राबवावा, गरिबांच्‍या चेह-यावर खुशी हे आपले ध्‍येय ठेवावे, मोदीजींच्‍या घोषीत योजना जनसामान्‍यांपर्यंत पोहचवाव्‍या, राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य स्‍वयंसेवक अभियान प्रत्‍येक गावात आणि प्रत्‍येक प्रभागात राबवावे असे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. यानंतर सौ. संध्‍या गुरनुले, सौ. वनिता कानडे, सौ. रत्‍नमाला भोयर यांचे समयोचित मार्गदर्शन लाभले. यावेळी सौ. अंजली घोटेकर आणि कु. अलका आत्राम यांनी बुथची रचना कशी करावी, बुथ यादीचे कसे वाचन करावे तसेच पक्षाच्‍या बुथ रचनेत महिलांनी सक्रीय सहभाग घ्‍यावा, महिला मोर्चा क्रियाशील व आक्रमण होण्‍याकरिता प्रत्‍येक पदाधिकारी व सदस्‍यांनी काम करावे असे मार्गदर्शन केले.

या बैठकीला चंद्रपूर महानगरातील सर्व पदाधिकारी व जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यातील महिला पदाधिकारी व सदस्‍या, जि.प. सदस्‍या, पं.सं. सदस्‍या, मनपा सदस्‍या, न.प. सदस्‍या यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.