जिल्हास्तरीय महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा 2021 संपन्न

जिल्हास्तरीय महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा 2021 संपन्न

भंडारा, दि.25:- जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 47 क्षेत्राशी संबंधित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल व विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर जिल्हास्तरावरील स्पर्धेचे आयोजन 17 व 18 ऑगस्ट 2021 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) भंडारा येथे करण्यात आले होते.

 सदर स्पर्धेमध्ये 47 क्षेत्रापैकी 13 क्षेत्रातील विविध कौशल्यामध्ये एकूण 108 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, सीएनसी टर्निग, वेल्डींग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, मेक्याट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन -आरएसी, पाककला, आयटी सॉफ्टवेअर सोल्युशन्स विझनेस, ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजी, आयटी नेटवर्क कॅवलिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, इत्यादी स्कीलचा या स्पर्धेमध्ये समावेश होता.

जिल्हा, विभाग व राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. विभागस्तराकरिता पात्र उमेदवारांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई मार्फत कळविण्यात येणार आहे. सदर जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा उमेश खारोडे, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) रविद्र रहमतकर, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा शैलेश भगत, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, एक्सेलस लर्निंग पीएमकेके भंडारा येथील केंद्र प्रमुख तुषार परशुरामकर व प्रशिक्षक अमोल तितिरमारे या समितीमार्फत करण्यात आले.