भंडारा : रानभाजी महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रानभाजी महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

भंडारा,दि,10 :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन भंडारा शहरातील सिव्हिल लाईन परिसरात भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजकुमार मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषी उपसंचालक अरुण बलसाने, भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, जिल्हा सल्लागार अजय आटे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, उद्यान पंडित शेतकरी भदू कायते, सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने, नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष देवानंद चौधरी, संजय एकापूरे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. रानभाजी महोत्सवात नैसर्गिकरित्या उगवलेल्या 66 प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये शेवगा, तरोटा, पातुर, मोहफुले, अंबाडी, करवंद, तांदूळजा, अडूळसा, उंदीरकाना, हर्दोली, वसंवेल अशा विविध प्रकारच्या रानभाज्या त्यांचे  आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व याविषयी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी दिली.

भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना निसर्गतः उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या व त्यातून होणारे रोजगाराविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी उपस्थितांना सर्व रानभाज्यांची औषधी गुणधर्म व केमिकल मुक्त रानभाज्यांमुळे शरीर कसे रोगमुक्त ठेवू शकतो. यासोबतच देशी वानांचे संवर्धन कसे होऊ शकते, याबाबत माहिती दिली.

संचालन कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी मानले. रानभाजी महोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून रान भाज्यांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.