भंडारा : कृषि केंद्रांवर कारवाई : खताचे 7 विक्री बंद आदेश  18 खत परवाने निलंबीत, युरीया विक्रीत अनियमीतता करू नये  – हिंदुराव चहाण

कृषि केंद्रांवर कारवाई : खताचे 7 विक्री बंद आदेश

 18 खत परवाने निलंबीत, युरीया विक्रीत अनियमीतता करू नये  – हिंदुराव चहाण

भंडारा,दि.9:- जिल्ह्यात सर्व प्रकारची खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून योग्य त्या प्रमाणात खत पुरवठा होत आहे. त्याची योग्य प्रकारे विक्री होते किंवा नाही यासाठी जिल्ह्यात व पवनी तालुक्यात खत विक्री केंद्र तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहीमेत काही कृषि केंद्र धारक युरीया खत पॉस मशिनवर न घेता विक्री करणे, शेतकऱ्यांना एम फॉर्म मध्ये बिले न देणे, खताची नोंद साठा पुस्तकावर न घेता विक्री करणे, साठा व दर फलक अद्ययावत नसणे या बाबी आढळून आल्याने खत विक्रीत अनियमीतता केलेल्या 7 कृषि केंद्रांना विक्री बंद आदेश देण्यात येवून 18 कृषि केंद्राचे परवाने निलंबीत करण्यात आलेले आहेत. पवनी तालुक्यातील 9 कृषि केंद्र, मोहाडी तालुक्यातील 5 कृषि केंद्रांचे, तुमसर तालुक्यातील 4 कृषि केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आलेले आहे.

भंडारा जिल्ह्यासाठी युरीया खताचे 23490 मे.टन आवंटन मंजूर झाले आहे. सद्यस्थितीत 16129 मे.टन युरीया उपलब्ध झालेला असून 12819 मे.टन युरीया खताची विक्री झालेली आहे. जिल्ह्यात एस.एस. पी. खत 8190 मे.टन व संयुक्त खते 7900 मे.टन उपलब्ध आहे. असे असतांना कृषि केंद्र युरीया विक्रीत अनियमीतता करतात ही बाब गंभीर असल्याचे हिंदुराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

पवनी तालुक्यातील सेलोकर कृषि केंद्र सावरला, गुरूदेव कृषि केंद्र पालोरा, बावनकर कृषि केंद्र, कोंढा, गजानन कृषि केंद्र कोंढा, शिवम कृषि केंद्र वासेला, सिध्दीविनायक कृषि केंद्र सावरला, कृषि आनंद एजन्सी आसगाव, बावनकर कृषि केंद्र, पवनी, महालक्ष्मी अॅग्रो एजन्सी पवनी, मोहाडी तालुक्यातील आसावरी कृषि केंद्र आंधळगाव, गणेश कृषि केंद्र सालई बुज., आयुष कृषि केंद्र डोंगरगाव, बडवाईक कृषि केंद्र चिंचोली, भुजाडे कृषि केंद्र जांब, तसेच तुमसर तालुक्यातील विजय कृषि केंद्र सिहोरा, अब्दुल गफ्फार सिहोरा, अग्रणी कृषि केंद्र डोगरला व अग्रवाल कृषि केंद्र देवसर्रा या कृषि केंद्रांनी खत विक्रीत अनियमीमता व पॉस मशिनवर खताची उचल न केल्याने त्यांचे खत परवाने निलंबीत करण्यात आलेले आहेत.

कृषि केंद्र धारकांनी खत विक्री करतांना खत नियंत्रण आदेशातील नियमांचे पालन करावे, युरीया खत विक्रीत अनियमीमता करू नये, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पुरवठा झालेला असून शेतकऱ्यांनी केवळ युरीया खताचा अवास्तव वापर न करता संयुक्त खतांचा वापर करावा असे आवाहन जिल्हा आक्षिक्षक कृषि अधिकारी, भंडारा हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.