भंडारा : कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही, नियमांचे पालन आवश्यकच – जिल्हाधिकारी संदीप कदम

कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही, नियमांचे पालन आवश्यकच – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • कोविड प्रोटोकॉल बंधनकारक
  • निष्काळजीपणा करू नका
  • मास्क अनिवार्य

            भंडारा, दि. 7 :- उपचाराखाली असलेला कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होऊन काल घरी गेला व भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी नागरिकांनी गाफील राहून व कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघण करून अजिबात चालणार नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहून जबाबदारीने नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

हलगर्जीपणा न करता कोविड-19 च्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. कोरोना गेला असा समज करून काही नागरिक सुरक्षित अंतर पाळत नाहीत तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीत. ही बाब योग्य नसून नागरिकांनी मास्कचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लग्न समारंभ, गर्दीची ठिकाण, बाजारपेठ अशा ठिकाणी नागरिक नियमांचे पालन न करता वावरतांना आढळतात. ही बाब गंभीर असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा ईशारा त्यांनी दिला.

           कोरोनाचा एकही रुग्ण उपचारखाली नाही म्हणजे कोरोना हा आजार कायमचा संपला हा समज करून घेणे अत्यंत धोकादायक आहे. धोका अजूनही टळला नसून सतर्कता व काळजी बाळगणे आवश्यकच आहे. नागरिकांचा निष्काळजीपणा व गाफीलपणा आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

           आज घडीला जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण उपचाराखाली नाही असे असले तरी भंडारा जिल्ह्याच्या आजूबाजूला तसेच अन्य जिल्ह्यात अजूनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब लक्षात घेता आपल्याला पुढील काही दिवस कोविड प्रोटोकॉल व नियमांचे पालन करावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.