भंडारा : अस्तित्वाच्या शोधात असलेल्या नाथजोगी समाजाच्या विकासाची पहाट

अस्तित्वाच्या शोधात असलेल्या

नाथजोगी समाजाच्या विकासाची पहाट

  • कोदामेंढी येथे विशेष शिबीर

  • विविध दाखल्याचे वितरण

  • जिल्हाधिकाऱ्याचा पुढाकार

भंडारा,दि.4:- दुसऱ्यांचे भविष्य सांगणाऱ्या कोदामेंढी येथील नाथजोगी समाजाला जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने महत्वाचे पाऊल टाकले आहे. विविध योजनेचा लाभ व दाखले देण्याचे काम विशेष शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. गेली अनेक वर्षे आपल्या अस्तित्वाच्या शोधात असलेल्या नाथजोगी समाजासाठी हे दाखले विकासाचे नवे पर्व ठरणार आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कोदामेंढी येथील नाथजोगी समाजाच्या वस्तीला भेट देऊन या समाजाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. शासकीय योजना व शिक्षणासाठी लागणारे दाखले या समाजाकडे नाहीत ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना या भेटीत लक्षात आली. विशेष शिबिराचे आयोजन करून दाखले व प्रमाणपत्र देण्यात येतील असे त्यांनी नाथजोगी समाजाला सांगितले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांनी कोदामेंढी येथे विशेष शिबीर आयोजित करून शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले व योजनांचा लाभ या समाजाला मिळवून दिला.

शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली या उद्देशाने कोदामेंढी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, तहसीलदार अखिल भारत मेश्राम व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नाथजोगी समाजाच्या वस्तीवरील पुरुष बहुतांश वेळा बाहेरच असतात. हस्तरेषा पाहून उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाला विकासाची आस आहे. भटकंतीचा परिणाम त्यांच्या नव्या पिढीच्या शैक्षणिक भविष्यावरही होत आहे. विशेष म्हणजे कायम भटकंतीवर असल्यामुळे महिलांमध्येही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे नाथजोगी समाजाचे विविध प्रश्न आहे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी सर्व शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली या उद्देशाने आयोजित शिबिरात घरकुल योजना, मतदान कार्ड, आधार कार्ड, घरगुती वीज मीटर जोडणी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, उत्पन्नाचा दाखला, आरोग्य तपासणी इत्यादी योजनांचा गरजूंना या शिबिरात लाभ देण्यात आला. या वस्तीतील अनेकांकडे आधार कार्ड नव्हते त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या. या शिबिरात तात्काळ आधार कार्ड बनवून दिल्यामुळे आता योजनांचा लाभ मिळण्यातील बाधा दूर झाली आहे.

पुरवठा विभागाला विभक्त रेशन कार्डचे 5 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी पाचही अर्ज निकाली काढण्यात आले. एमएसईबी विभागामार्फत नवीन कनेक्शनचे अर्ज भरून घेण्यात आले. आरोग्य विभागामार्फत नागरिकांचे बीपी, शुगर तपासणी करण्यात आली. कृषी विभागामार्फत विविध कृषी योजनांचे माहिती पत्रक वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबीराअंतर्गत कोविड लसीकरणाचे शिबीर घेण्यात आले. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज आहे त्यामुळे नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना कोविड लसीकरण करण्यात आले. या लसीकरण शिबीराला नागरिकांनी लस घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबीरात महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, वीज विभाग व निवडणूक विभाग यांनी सहभाग घेतला.