हरणघाट-चामोर्शी रस्ता राज्यमार्ग-370 मार्गावरील जडवाहतुक प्रतिबंधित करणेबाबत

हरणघाट-चामोर्शी रस्ता राज्यमार्ग-370 मार्गावरील जडवाहतुक प्रतिबंधित करणेबाबत

गडचिरोली,दि.02: हरणघाट-चामोर्शी रस्ता राज्यमार्ग -370 कि.मी. 34/670 ते 49/500 वर रस्त्याची सुधारणा करण्याचे काम शासनाकडून मंजूर असून कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सदर रस्त्यावर सुरजागड येथील लोह खनिज तसेच कोनसरी येथील लॉयडस मेटल कंपनीचे जड व अतिजड वाहनांची वर्दळ सुरु असल्याने काम करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने सदर मार्गावरील वाहतूक चामोर्शी- गडचिरोली- मुल या पर्यायी मार्गाने वळती करण्यास विनंती केलेली आहे.
उपरोक्त बाबत लॉयडस मेटल कंपनीचे अभियंते यांची सदर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यास त्यांची हरकत नसल्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, संजय मीणा यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन याद्वारे आदेशित केले आहे की, हरणघाट- चामोर्शी रस्ता राज्यमार्ग -370 मार्गावरील दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतुक (प्रवासी बसेस व पाणीपुरवठा/महावितरण/दुरसंचार/रस्ते दुरुस्तीसंदर्भात वाहने वगळून) वाहनांना दिनांक 01 फेब्रुवारी 2024 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत प्रवासास मज्जाव असेल. उक्त कालावधी करिता पर्यायी मार्ग म्हणून आष्टी- चामोर्शी-गडचिरोली-मुल या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 चे तंतोतंत पालन करावे. वाहतुकीस अयोग्य रस्ता वा पुल बिना बॅरेकंडीग वा योग्य काळजी न घेता खुले ठेवल्यास सदर मार्गावर अपघात झाल्यास संबंधित विभागप्रमुख तसेच संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तसेच सदरचे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कोणत्याही वाहतुकदारास व व्यक्तीविरुद्ध भारतीय दंडसहिता 1860 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे प्रचलीत नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.