दहिसर येथील कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार # तिसरी लाट थोपविण्यासाठी कोविड नियमांचे अनुपालन आवश्यक – राज्यपाल कोश्यारी

दहिसर येथील कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

तिसरी लाट थोपविण्यासाठी कोविड नियमांचे अनुपालन आवश्यक – राज्यपाल कोश्यारी

 

            मुंबई, दि. 22 : आपल्या देशात राजा हरिश्चंद्र व महर्षी दधिची यांनी दातृत्वाचे आदर्श समाजापुढे ठेवले आहेत. कोरोना काळात समाजबांधवांना मदत करून या परंपरेचे पाईक असल्याचे कोरोना योद्ध्यांनी दाखवून दिले. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका कायम असल्याने ही लाट थोपविण्यासाठी अहर्निश जागरूक राहून मास्कचा वापर, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे आदी कोविड नियमांचे अनुपालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

            दहिसर विधानसभा क्षेत्रातील ४५ कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २२) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी व मंडळ प्रमुख अरविंद यादव व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला दहिसर येथील नगरसेवक व कोरोना योद्धे उपस्थित होते.

            कोविड -१९ अद्यापही आहे, हे लक्षात घेऊन परस्परांना सहयोग व नियमांचे पालन केल्यास कोरोनावर नियंत्रण तर मिळेलच आणि देशही अधिक प्रगती करेल असे राज्यपालांनी सांगितले.

            मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात दहिसर येथील गरजू लोकांना खिचडी वाटप, महिन्याचे सामान, मास्क, सॅनिटायझर आदी आवश्यक वस्तू पुरविल्याबद्दल राज्यपालांनी मनिषा चौधरी यांचे अभिनंदन केले.

राज्यपालांच्या हस्ते अनिल कान्तीप्रसाद पोद्दार, रमेश शहा, चिराग दोषी, मार्क डिसुझा, बिना शाह, नटवरलाल पुरोहित, हरीश कुमार जैन, आदीं कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.