भंडारा : लोकसंख्या स्थिरता पंधरवडा

लोकसंख्या स्थिरता पंधरवडा

भंडारा, दि.13:- कोविड 19 या आजाराचे संकट असले तरीही कुटुंब नियोजनाची सेवा नियमित सुरू ठेवणे गरजेचे आहे. कारण कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छूक नसलेल्या गर्भधारणा टाळणे ऐवढ्यापुरता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन एक दिवस साजरा करण्याऐवजी दोन टप्प्यात साजरा करण्यात येत आहे. यामध्ये पहिला टप्पा दांपत्य संपर्क पंधरवडा 27 जून ते 10 जुलै या कालावधीत राबविण्यात आला व दुसरा टप्पा लोकसंख्या स्थिरता पंधरवडा 11 ते 24 जुलै 2021 या कालावधीत राबविण्यास सुरूवात झाली आहे. या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाच्या सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

लोकसंख्या स्थिरता पंधरवडा यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पूर्व नोंदणी करण्यात येणार आहे. पिक्स डे सेशन वेळी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी घातलेल्या मर्यादेचे पालन केले जाईल. शिबीराचे आयोजन करतांना संसर्ग प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन पिक्स डे सेशनचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालय स्तरावर 10 आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 शस्त्रक्रियागृह कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालय स्तरावर संतती प्रतिबंधक साधने उपलब्ध करुण देण्यात आलेले आहे. सर्व आरोग्य संस्थामध्ये स्त्री नसबंदी अथवा पुरूष नसबंदी सत्राच्या वेळापत्रकानुसार निश्चित कार्यक्रम तयार करण्यात आला असून आवश्यकतेनुसार प्रत्येक संस्थेकरिता सर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.