मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व सायबर सुरक्षा विषयावर कायदेविषयक जनजागृती सप्ताह

मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व सायबर सुरक्षा विषयावर कायदेविषयक जनजागृती सप्ताह

चंद्रपूर, दि. 31 : मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 व सायबर सेक्युरीटी या विषयावर शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस अधीक्षक कार्यालय, सायबर सेल, यांच्या संयुक्त विद्यमाने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या हेतूने शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना कायद्याविषयीची माहिती देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा-2012 या कायद्याबाबत विविध उदाहरणे देऊन माहिती दिली.  विद्यार्थ्यांनी चांगला स्पर्श, वाईट स्पर्श व सुरक्षित स्पर्शाबाबत जागरूक असले पाहिजे. काही अनुचित प्रकार घडत असल्यास शाळेतील मुख्याध्यापक आणि पालकांना सांगावे, असे आवाहन देखील श्री. जोशी यांनी मार्गदर्शनातून केले.

 सायबर सेप्टी सेलचे मुजावर अली यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कोणकोणत्या प्रकारचे असतात? त्यापासून आपण स्वतः व पालकांना कसे सुरक्षित ठेवावे, याबाबत माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या गुन्हेगारीपासून कसे परावृत्त व्हावे तसेच कोणत्याही आमिश व प्रलोभनाला बळी पडू नये, याबाबत माहिती दिली.

या शाळांमध्ये पार पडले जनजागृती कार्यक्रम :

इंदिरा गांधी गार्डन स्कुल, चंद्रपूर, वन अकादमी, शहिद हेमंत करकरे न्यू डॉन इंग्लिश स्कुल, मातोश्री विद्यालय, तुकूम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कुल मुरसाळा, महानगरपालिका प्रागंण, चंद्रपूर या याठिकाणी सप्ताह दरम्यान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.