औषधांच्या पॅकिंगनुसार दर्शविण्यात आलेल्या घटकांच्या तपासणीसाठी समिती स्थापन करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

औषधांच्या पॅकिंगनुसार दर्शविण्यात आलेल्या घटकांच्या तपासणीसाठी समिती स्थापन करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. १७ : औषध विक्रेते आणि औषध विक्रेत्या कंपन्यामार्फत पॅकिंगवर दर्शविण्यात आलेल्या घटकांची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती औषधांतील घटकांची तपासणी करेल. अन्न व औषध प्रशासन सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या जाणाऱ्या या समितीच्या अहवालानंतर दोषी आढळलेल्या संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला असता, मंत्री श्री झिरवाळ यांनी उत्तर दिले. यात सदस्य अरूण लाड, सदाशिव खोत यांनीही सहभाग घेतला.

यावर मंत्री श्री.झिरवाळ म्हणाले की, नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान राज्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमधून ९७९ औषध नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी ११ नमुन्यांमध्ये औषधांचा मूळ घटक नसल्याचे स्पष्ट झाले. या नमुन्यांची माहिती तज्ज्ञांच्या अहवालात नमूद झाली होती. संबंधित औषध पुरवणाऱ्या ११ कंपन्यांचा बनावट औषध वितरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

या प्रकरणात सात आरोपींची नावे समोर आली असून, त्यापैकी दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, तर चार जण सध्या कोठडीत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस तपासात ही औषधे आंबेजोगाई येथे आढळून आली असली तरी, त्याचे जाळे ठाणे, भिवंडी, लातूर आणि नांदेडपर्यंत पसरले असल्याचेही मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

सदस्य अरूण लाड यांनी औषधांच्या किंमतीतील फरक व उत्पादकांकडून ठरवून दिले जाणारे कमिशन याकडे लक्ष वेधले असताना, झिरवाळ यांनी केंद्र सरकारच्या संबंधित कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.

तपासात उघडकीस आलेल्या काही बनावट औषध वितरक कंपन्यांची नावेही मंत्री श्री.झिरवाळ यांनी सांगितली. यामध्ये विशाल इंटरप्राइजेस (कोल्हापूर), मे जया इंटरप्राइजेस (लातूर), बायोटेक (भिवंडी, ठाणे) यांचा समावेश असून, यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. भविष्यात असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.