सिंगल युज प्लास्टीक  वापरणा-यांना होणार दंड जिल्हाधिका-यांनी दिले निर्देश

सिंगल युज प्लास्टीक  वापरणा-यांना होणार दंड जिल्हाधिका-यांनी दिले निर्देश

          भंडारा: दि. 7 :सणासुदीच्या वातावरणात मोठया प्रमाणावर  सजावटीसाठी एकल वापर प्लास्टीक (सिंगल यूज प्लास्टिक )  वापरण्यात येते. त्यांचा वापर करून निसर्गाला हानी पोहोचविणा-यांविरूध्द दंडाची कारवाई करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. नागरिकांनी या ऐवजी पर्यावरणपूरक  साहीत्यातून  सजावट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

         सिंगल यूज प्लास्टिकच्या व्याख्येनुसार  एकदा वापरून फेकुन देण्यात येणारे व पुर्नवापर न होणारे प्लास्टीक  म्हणजे सिंगल युज प्लास्टीक  होय.अशा प्रकारच्या सिंगल यूज प्लास्टिक  प्रतिबंधासाठी गठीत जिल्हास्तरीय टास्क् फोर्सच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

          या बैठकीला नगरपरिषद मुख्याधिकारी  विनोद जाधव,महाराष्ट् प्रदुषण नियामक मंडळाचे व्यवस्थापक किशोर पुसदेकर,प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच व्हिसीव्दारे सर्व गटविकास अधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी  उपस्थित होते.

          सिंगल यूज प्लास्टिक हे विघटीत तसेच पुर्नवापर करता येत नाही तसेच  ते जाळूनही टाकल्या जाऊ शकत नाही. जमिनीखाली पुरल्यास  जमीनीच्या थराचे नुकसान होते. सिंगल यूज प्लास्टिक पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहे. तसेच यामुळे पाणी जमीनीत न झिरपत नसल्याने जमीनीची सच्छीद्रता कमी होते ,अशी माहिती व याबाबतच्या कायदयाची माहिती श्री.पुसदेकर यांनी उपस्थितांना दिली.

         मोठया ग्रामपंचायती व नगर परिषदेच्यावतीने सिंगल युज प्लास्टीक विषयी जनजागृती  करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी  दिले. मोहीम राबवून सुरुवातीला व्यावसायिकांना प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याची  सूचना दयावी. मात्र, त्यानंतरही पिशव्यांचा वापर केल्यास पहिल्या गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्यात दहा हजार रूपये व  त्याच व्यक्तीने तिसरा गुन्हा केल्यास 15 हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांच्या कारावासाची ठोठावली जाणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व पर्यावरणपूरक साहीत्याचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

         प्लास्टिकला पर्यायी साहित्याचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन देखील जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. प्लास्टिकऐवजी बांबूपासून बनवलेले चमचे, बांबू स्टिकचा वापर करता येतो. तसेच प्लास्टिक कपच्या जागी कुल्हडचा वापर करता येऊ शकतो.केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक  निमुर्लन तसेच व्यवस्थापनासाठी तसेच राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या निर्णयानुसार अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ भार अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविटनशील  हाताळणी अधिनियम संपूर्ण राज्यात लागू केला आहे. त्यानुसार आता याची अंमलबजावणी  करण्यात येणार आहे.