नागरिकांना वेळेत सेवा देणे हेच खरे सुशासन – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  

नागरिकांना वेळेत सेवा देणे हेच खरे सुशासन – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  

· सुशासन सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजन

 

भंडारा, दि. 23: नागरिकांना वेळेत सेवा देणे हेच खरे सुशासन असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी आज सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यशाळेत केले. तर नागरिकांना सेवा देतानी नेहमी हसतमुख राहून व चांगले संवाद कौशल्य ठेवून नागरीकांशी व्यवहार करणे ही देखील बेस्ट प्रॅक्टिस असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी सांगितले.

 

देशभरात 19 ते 25 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयात सहा विभागांनी उत्कृष्ट कार्यप्रणाली म्हणजे बेस्ट प्रॅक्टीसेसचे सादरीकरण केले.

 

भंडारा जिल्ह्यातील आरोग्य विभाग, कृषी विभाग, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती अधिकारी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगरपरिषद भंडारा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळेस त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस ची माहिती दिली.

 

महिला आर्थिक विकास महामंडळांनी केलेले बहुविध कांडप वाटप तसेच ई-रिक्षा, जिल्हा कृषी विभागाने लाभार्थ्यांना मिळवून दिलेले लाभ, सूचना व तंत्रज्ञान कार्यालयांनी अंमलबजावणी केलेली ई-ऑफिस प्रणाली, जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी समाज माध्यमांचा उपयोग व आरोग्य विभागामार्फत माता सुरक्षित तर भर सुरक्षित अभियानाची यशस्विता आदींवर यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी विस्तृत सादरीकरण केले. यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी शासनाच्या अन्य विभागांनी देखील अशा पद्धतीचे सादरीकरण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, संचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले.