कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही तर्फे जागतिक मृदा दिन साजरा

कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही तर्फे जागतिक मृदा दिन साजरा

दि. ०५ डिसेंबर २०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्र  सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर तर्फे मौजे नाचणभट्टी ता. सिंदेवाही येथे ‘जागतिक मृदा दिन’ (World Soil Day) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्षीच्या मृदा दिवसाची थीम “Soils: Where food begins” म्हणजे ‘माती, ज्या ठिकाणी अन्नसाखळीची सुरुवात होते’ अशी आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्हि.जी नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, के. व्ही. के. सिंदेवाही, तसेच उदघाटक, सौ. विद्याताई मनोज खोब्रागडे, सरपंच, नाचणभट्टी होते. प्रमुख उपस्थितीत श्री.भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपुर होते. श्री. ए.आर महाले, ता. कृ. आ, सिंदेवाही आणि श्री. जयंतराव नागोसे, तंटामुक्ती अध्यक्ष याची उपस्थिती लाभली. प्रमुख मार्गदर्शनामध्ये डॉ.विजय एन.सिडाम, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार यांनी, अलिकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे, जमिनीची सुपीकता खालावत असून तिचे आरोग्य बिघडत आहे. सेंद्रीय कर्बाचे जमिनीतील प्रमाण गांभीर्याने घटत चाललेले आहे. त्याकरिता उपाययोजना म्हणून शेती करताना जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, पिकांची फेरपालट, कंपोस्ट खत, सेंद्रिय खतांचा नियमित वापर करुन जमिनीची सुपिकता याविषयी मागदर्शन केले. डॉ. सोनाली लोखंडे यांनी माती परिक्षण, मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा याविषयी तसेच पोषणमुल्याचे आहारातील महत्व, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)  या विषयी मागदर्शन केले. श्री.भाऊसाहेब ब-हाटे यांनी रब्बी हंगाम मध्ये करडई, रबी ज्वारी, जवस, मोहरी या पिकाचे लागवड मोठ्या प्रमाणात करावे असे अवाहन केले व कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच मुल्यवर्धीत पदार्थाचे महत्व सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ. व्ही. जी. नागदेवते यांनी मृदेचं महत्त्‍व मध्ये जगातील ९५ टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येते. तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आसरा घेतात. फळे, भाज्या आणि अन्नधान्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरुन ठरते. सध्या या मृदेच्या संवर्धनासमोर वातावरण बदलाचे मोठे आव्हान उभे आहे त्याकरिता माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकातील योग्य खत देण्याच्या पद्धती आणि मृदा आरोग्य सुधारणा करण्यासाठी शेणखत, हिरवळीचे खत,गांडूळ खत, कृषी हवामान विभागा नुसार पिक पद्धतीचा अवलंब, आंतरपीक पद्धतीला प्रोत्साहन देणे या विषयी शेतक-यांना सखोल मागदर्शन केले. कार्यक्रमासाठी नाचणभट्टी येथील शेतकरी व महीला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.व्हि. एस.निकम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. ए.आर महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. परमानंद चहान्दे, श्री.पंकज चौधरी, श्री. एस.तायडे आणि कैलाश कामडी यांनी सहकार्य केले.