मूल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी 25.55 कोटी रुपये निधी वितरित

मूल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी 25.55 कोटी रुपये निधी वितरित

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

कृषी मंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर चारच दिवसात शासन निर्णय निर्गमित

मुंबई/चंद्रपूर दि.7 : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दि.3 नोव्हेंबर रोजी 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले होते. वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने चारच दिवसात या बाबत शासन निर्णय निर्गमित होऊन सदर निधी वितरित करण्यात आला आहे.

मुंबई येथे मंत्रालयात दि.3 नोव्हेंबर रोजी कृषी मंत्री श्री सत्तार यांच्यासोबत मूल कृषी महाविद्यालयासंदर्भात श्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक आयोजित केली होती. कृषी मंत्री श्री.सत्तार यांनी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 25.55 कोटी रु निधी मंजूर करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.

मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी पहिल्‍या टप्‍प्‍यात 64.59 कोटी रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. शासनाच्‍या कृषी व पदूम विभागाच्‍या 16 मार्च 2022 च्या शासन निर्णयान्‍वये सदर कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी 64.59 कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला होता.

श्री. मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्रीपदाच्‍या कार्यकाळात दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये मुल-मारोडा येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्‍यात आले. या महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी महाराष्‍ट्र कृषी संशोधन परिषद पुणे यांच्‍यामार्फत रू.133.35 कोटींचा प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला होता. या प्रस्‍तावाची छाननी करून 64.59 कोटीच्‍या प्रस्‍तावाला प्रशासकीय गेल्या वर्षी मार्च मध्ये मान्‍यता देण्‍यात आली.सदर कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्‍ध करावा यासाठी श्री.मुनगंटीवार यांनी सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला होता. सदर कृषी महाविद्यालयासाठी 25.55 कोटी रु निधी वितरित झाल्याने बांधकाम व अनुषंगिक बाबींचा मार्ग सुकर झाला आहे.

निधी मंजूर व वितरित केल्याबद्दल कृषी मंत्री श्री. सत्तार यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले आहे. सदर कृषी महाविद्यालय राज्यातील उत्तम कृषी महाविद्यालय ठरेल असा आशावाद देखील श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.