इतर मागास विजाभज, विमाप्र प्रवर्गासाठी परदेशात शिक्षणासाठी आता 50 मुलांना संधी

इतर मागास विजाभज, विमाप्र प्रवर्गासाठी परदेशात शिक्षणासाठी आता 50 मुलांना संधी

गडचिरोली,दि.14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 10 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते महाराष्ट्रातील इतर मागास, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शासनातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी संख्येत 10 वरुन 50 इतकी वाढ करण्यात आलेली आहे.

     सन 2022-23 पासून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थी संख्येत 10 वरुन 50 इतकी शाखानिहाय वाढ करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी, वास्तुकला शाखा 19 विद्यार्थी, व्यवस्थापन-10, विज्ञान- 6, कला-4, विधी अभ्यासक्रम-4, पीएचडी-3, वाणिज्य-2, औषध निर्माण शास्त्र-2 असे एकूण 50 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.

      सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी 2 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी 1 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी विमान तिकीटासह एका विद्यार्थ्यांमागे प्रतिवर्षी 30 लाख रुपयाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रतीविद्यार्थी प्रतीवर्षी 40 लाख रुपयाच्या मर्यादेत शाखा, अभ्यासक्रम निहाय परदेश शिष्यवृत्ती अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण नागपूर डॉ. सिध्दार्थ गायकवाड, यांनी केले आहे.