जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

भंडारा, दि. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालय, भंडारा, कौंटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालय तसेच जिह्यातील सर्व तालुक्याच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये येत्या 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

न्यायालयात दाखल असलेली सर्व तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, दिवाणी दावे तसेच दाखल पुर्व तडजोड पात्र प्रकरणे येत्या राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयांमध्येही लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, एन. आय. एक्टची प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे.

तरी ज्या पक्षकारांना आपली अशाप्रकारची प्रकरणे या लोक अदालतीमध्ये निकाली काढायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात ताबडतोब अर्ज सादर करुन, या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंजू एस. शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बिजु बा. गवारे यांनी केले आहे.